आईला मारहाण करून केली हत्या, आत्महत्येचा रचला बनाव; पोलिसांनी केला लेक-सुनेच्या गुन्ह्याचा पर्दाफाश

लोहारा येथे एका क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. येथे मुलगा आणि सुनेने केलेल्या मारहाणीत रक्तस्त्राव होऊन आईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सौदागर सुरेश रणशूर आणि सून पूजा सौदागर रणशूर, अशी आरोपींची नावे असून उमाबाई सुरेश रणशूर (वय ५५) असे महिलेचे नाव आहे.
या घटनेनंतर आरोपींनी पोलीस आणि नातेवाइकांची दिशाभूल करण्यासाठी उमाबाई यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला आणि मृतदेह पंख्याला अडकवला. मात्र, शवविच्छेदन अहवालात रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने या खुनाचा पर्दाफाश झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास उमाबाई आणि सूनपूजा यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, सौदागर आणि पूजा यांनी मिळून उमाबाई यांना बेदम मारहाण केली. यात उमाबाई यांच्या जबड्याला गंभीर मार लागल्याने तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कोणालाही कळू नये म्हणून आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचला आणि मृतदेह पंख्याला लटकवला.
उमाबाई यांचा लहान मुलगा महेश सुरेश रणशूर याच्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसांनी दिनांक २६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता सौदागर आणि पूजा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, लोहारा कनिष्ठ स्तर न्यायालयाने त्यांना ३० ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करत आहेत.
Comments are closed.