दहराशिव न्यूज – क्रीडा उद्योग परिधान केले! अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र थांबले

>> राकेश कुलकर्णी

मांजरसुंब्याचा घाट ओलांडून धाराशिवकडे निघाले की आसमंतात खरपूस दरवळ जाणवतो. दुधदुभत्याचा राबता सुरू झाला की समजायचे, भूम-परंडा आले! दररोज पाच ते सहा लाख लिटर दुधाची खरेदी विक्री करणारे हे गोकुळ। दुधाबरोबरच खव्याच्या बाजाराने या दोन्ही तालुक्यांच्या अर्थकारणाला बळकटी आणली. या गोकुळाला महापुराची नजर लागली. गेल्या आठवड्यात झालेल्या प्रलंयकारी पावसामुळे हा दुधदुभत्याचा बाजारच उठला. गोकुळ वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलला. पण भूम-परंड्याचे गोकुळ महापुरात वाहून जात असताना आमचे सरकार दांडियात नाचत होते!

भूम-परांड्याचे अर्थकारणच दुधावर चालते. लहान असो वा मोठा शेतकरी, तो गोधन बाळगून आहे. काही शेतकऱ्यांनी आता या दूध उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. भूम-परंड्यातून दररोज साधारण पाच ते सहा लाख लिटर दुधाचे संकलन होते. या दूध व्यवसायाने अनेकांना रोजगार दिला आहे. सध्या महिन्याकाठी साधारण दोन लाख रुपयांचे दूध विकणारे शेतकरीही आहेत. दूध काढणारे, दूध घालणारे, जनावरांची राखोळ, जनावरांचा चारा असे अनेक पूरक रोजगार यातून निर्माण झाले. भूम परांड्यातील शेतकऱ्यांनी या व्यवसायाचा पसारा मेहनतीने वाढवला. यातून अनेकांचे संसार उभे राहिले. भूम-परंड्याची बाजारपेठ सजली, पोसली ती याच दुधाच्या व्यवसायावर.

कुंथलगिरीच्या पेढ्याला ‘जीआय’ मानांकन

भूम-परंड्यातील दूध व्यवसाय महामार्गाच्या कडेकडेने बहरला. आज सोलापूरकडे जाणारी प्रत्येक गाडी कुंथलगिरीचा पेढा, सरमकुंडीचा खवा घेतल्याशिवाय पुढे जात नाही. कुंथलगिरीचा पेढा तर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून पुढे पार छत्तीसगड, कर्नाटक, आंध्रप्रदेशापर्यंत पोहोचला. या व्यावसायिकांनी अत्यंत कष्टाने पेढ्याला ‘जीआय’ मानाकंन मिळवले. दररोज साधारण 50 लाखांपर्यंतची उलाढाल या व्यवसायातून होते. भूम तालुक्यातील पाथरूड तसेच परिसरात दररोज किमान पाच टन खव्याचे उत्पादन होते. या भागात लहान मोठ्या जवळपास दोनशे खवा तयार करणाऱ्या पट्ट्या आहेत. एक किलो खवा बनवण्यासाठी साधारण पाच लिटर दूध लागते. खवा व्यावसायिक शेतकऱ्यांच्या दुधाला 35 ते 40 रुपये लिटर असा भाव देतात.

दूध संकलन 70 टक्क्यांनी घटले

गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरात शेकडो दुधाळ जनावरे वाहून गेली, काही खुंट्यालाच मृत झाली. तालुक्यात सध्या चाऱ्याची चणचण आहे. त्यातच जनावरांमध्ये साथरोग पसरण्याची भीती आहे. धूम-परंडा तालुक्यांत एकुण एक रस्ता खचला. पूल वाहून गेले. त्यामुळे दूध संकलनच काही काळ ठप्प झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन दूध घालायला सुरुवात केली असली तरी हे प्रमाण अत्यल्प आहे. सध्या दूध संकलन 70 टक्क्यांनी घटले असल्याचे सांगण्यात येते. याचा थेट परिणाम खवा उद्योगावर झाला असून उत्पादनही निम्म्यावर आले आहे. दसरा, दिवाळीत खव्याला प्रचंड मागणी असते. या दिवसांत दरही चांगला मिळतो.

भूम, परंडा तालुक्यात पुरामुळे रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक गावात सध्या दूध संकलन करणाऱ्या गाड्या पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरीही संकटात सापडला असून अशा शेतकऱ्यांना दूध नदीत ओतण्याची वेळ आली आहे. भूम तालुक्यातील पाठसांगवी या गावात दररोज सुमारे 5 ते 6 हजार लिटर दूध उत्पादन होत असून या गावात येण्यासाठी असणारा पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दूध संकलन केंद्रावर पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

महापुरामुळे शेतकत्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धूम-परंडा 66 तालुक्यातील पशुधनाला याचा मोठा फटका बसला आहे. दोन्ही तालुक्यांतील दूध व्यवसाय आणि खवा उद्योग महापुरामुळे संकटात सापडला आहे. या संकटातून आम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारकडून आम्हाला भरीव मदतीची अपेक्षा – बाळासाहेब गुळवे, खवा उत्पादक, जांब

Comments are closed.