भाजपला सत्तेपासून रोखणार, धाराशिवमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणार? असं जुळणार ZP चं गणित
धाराशिव बातम्या: धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. स्पष्ट बहुमताचा ‘मॅजिक फिगर’ 28 असताना, सत्ता स्थापनेसाठी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) आणि शिवसेना (शिंदे गट) नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. भाजपला रोखण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dharashiv News: ठाकरे गट व काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा?
सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेत तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. मात्र, हे समीकरण जुळवताना सावंत यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शिवसेनेतीलच एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Dharashiv News: बहुमतासाठी आकडेमोड
सध्याच्या राजकीय गणितानुसार दोन प्रमुख समीकरणे चर्चेत आहेत.
समीकरण 1 (भाजपच्या बाजूने):
भाजप – 19
शिवसेना (शिंदे गटातील सावंत समर्थक वगळून) – 7
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 6
अपक्ष – 3
एकूण: 35
समीकरण 2 (भाजपविरोधी आघाडी):
शिवसेना (शिंदे गट) – 15
ठाकरे गटाची शिवसेना + काँग्रेस – 10
अपक्ष – 3
एकूण: 28 (मॅजिक फिगर)
यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dharashiv News: निकालाचा आढावा
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप 19 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 15 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळाले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही.
Dharashiv News: ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांना धक्का
या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना बसल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाने 44 जागा लढवून केवळ 7 जागा जिंकल्या. उलट, तानाजी सावंत यांनी आपल्या मतदारसंघातील 13 पैकी 8 जागा जिंकत दबदबा कायम राखला आहे. बंडखोरी करणारे धनंजय सावंत हेही विजयी झाले आहेत.
Dharashiv News: दगाफटका टाळण्यासाठी ‘सहली’चा फॉर्म्युला
कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी सर्व पक्षांनी निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना सहलीवर पाठविल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेपर्यंत सदस्य सुरक्षित ठेवण्यावर सर्वच पक्षांचा भर दिसतो आहे. महायुतीला संख्याबळ असले तरी अध्यक्षपद नेमके कुणाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आपली ताकद वापरून सत्ता काबीज करणार की भाजपविरोधी आघाडी शेवटच्या क्षणी चमत्कार घडवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.