जेतेपदासाठी धाराशीव-सोलापूर तर सांगली-ठाणे भिडणार कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो

51 व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत अंतिम फेरीचा महामुकाबला निश्चित झाला असून कुमार गटात गतविजेत्या धाराशिवची लढत सोलापूरशी, तर मुली गटात सांगली व ठाणे विजेतेपदासाठी भिडतील.

कुमारींच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या धाराशीवला ठाण्याने 40-23 असा दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यांनी मध्यंतरापासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवत 16-10 अशी आघाडी घेतली होती. ठाण्याच्या विजयात अक्षरा भोसलेने 16 गुण व 1.10 मिनिटे पळतीचा खेळ सादर करत सिंहाचा वाटा उचलला. मुलींच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गत उपविजेत्या सांगलीने सोलापूरला 26-23 असे 1.50 मिनिटे राखून 3 गुणांनी हरवले. सांगलीकडून सानिया सुतार (1 मि. संरक्षण व 8 गुण) आणि सानिका चाफे (2.50,  नाबाद 1.30 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली.

कुमारांच्या पहिल्या उपांत्य लढतीत सोलापूरने सांगलाचा 39-38 असा अवघ्या एका गुणाने पराभव करत अंतिम फेरी गाठली.  मध्यंतरास 18-20 अशी पिछाडी असतानाही सोलापूरने शानदार पुनरागमन केले. त्यांच्या सिद्धार्थ माने देशमुख (1.50 मि. व 8 गुण), सुहाना आत्तार (1.35 व 6 गुण), अरमान शेख (6 गुण) व शंभूराज चंदनशिव (6 गुण) यांनी आक्रमणाची धार कायम ठेवली.दुसऱया उपांत्य फेरीत गतविजेत्या धाराशिवने पुण्यावर 32-19 अशी मात केली. मध्यंतराची 12-18 ही पिछाडी पुण्यास महागात पडली. धाराशिवकडून सोत्या वळवी (1, 1.10 मि. संरक्षण व 8 गुण), जितेंद्र वसावे (2.20 मि. संरक्षण व 2 गुण) व राज जाधव (2 मि. संरक्षण व 6 गुण) यांनी चमकदार खेळी केली. तर पराभूत पुण्याच्या शंकर यादव (12 गुण) व आदेश पाटील (1.30, 2 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी कडवी झुंज दिली.

Comments are closed.