धारावीतील एसआरए प्रकल्पात दलालांचा झोल; शिडी, मंदिर, पान टपरी, मीटर केबिन झोपडी दाखवली!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

धारावीच्या शताब्दी नगरात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अस्तित्वात नसलेली घरेही बोगस कागदपत्रे बनवून लाटली गेल्याचे समोर आले आहे. शिडीखालची जागा, मंदिर, पान टपरी आणि मीटर केबिनही झोपडी असल्याचे दाखवून संबंधित अधिकाऱयांच्या संगनमताने दलालांनी त्यावर घरे मिळवली आहेत. या घोटाळ्यात अनेक मूळ रहिवासी भरडले गेले असून त्यांच्या तक्रारींकडे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण दुर्लक्ष करत आहे.

शताब्दी नगरमधे 857 मूळ झोपडय़ा होत्या. त्यातील अनेक झोपड्या पुनर्विकासात अपात्र ठरवण्यात आल्या. पुनर्विकासानंतर शताब्दी नगरात एसआरएने इमारती उभारल्या, पण रिकामी केलेल्या झोपड्या हटवल्याच नाहीत. काही दलालांनी त्या रिकामी झोपडय़ांमध्ये पुन्हा वास्तव्य करून त्या आधारावर घरे मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. एसआरएकडून पात्र रहिवाशांच्या याद्या लावल्या गेल्या. त्यात 20 लोक बोगस आढळली असून चक्क मूळ झोपडय़ांच्या नंबरपुढे ‘ए’ लावून बोगस झोपडय़ा दाखवल्या आहेत व त्यांना एसआरएने बनावट कागदपत्रांच्या आधारावर पात्र ठरवले आहे, असा आरोप धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने यांनी केला. त्यासंदर्भात स्थानिक नागरिकांच्याच तक्रारी आहेत. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे बाबुराव माने यांनी याबाबत पुराव्यांनिशी तक्रार दिली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱयांची नावेही त्यांनी तक्रारीत नमूद करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि तोपर्यंत घरांचे चावी वाटप करू नये अशी मागणी केली नाहे. तक्रारीची प्रत राज्याच्या मुख्य सचिवांनाही त्यांनी पाठवली आहे. दरम्यान, 3 फेब्रुवारीला ही तक्रार करूनही अद्याप काहीच कारवाई केली गेली नाही, असा आरोप माने यांनी केला.

हातचलाखी

व्ही/जे/५२६ – हा घर नंबर मूळ दुर्गे या रहिवाशाच्या नावे आहे. पात्र असूनही त्यांना चावी मिळालेली नाही. याच नंबरवर सितारा बेगम नसीम अहमद खान ही व्यक्ती डुप्लिकेट फाईल बनवून चावी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. व्ही/जे/६६४६/ घराबाहेरच्या शिडीखाली प्लास्टर करून अमीर अन्सार खान या नावाने हा नंबर टाकून घर असल्याचे भासवले जात आहे. कारण या नंबरची झोपडीच सर्वेक्षणाच्या मॅपवर नाही. व्ही/जे/६८२/ अजाज अहमद मिर्जा व राहीबाई संदीपा माने अशा दोन फायली या एकाच नंबरवर घरासाठी दाखल आहेत.

व्ही/जे/6/ए – नकाशात नमूद नसतानाही पान टपरीवर हा नंबर टाकून घर दाखवले गेले. व्ही/जे/२९/b ही मूळ झोपडी जयदीप महादेव कटके यांची आहे. पण याच नंबरवर सुचिता एकनाथ कामेरकर ही फाईलही दाखल आहे. व्ही/जे/५५ – ही झोपडी मूळ रहिवासी मेहबूब पाशा यांची आहे. त्यांनी चावी घेतली. पण याच क्रमांकावर तीन बोगस फायली एसआरएत जमा आहेत. पाशा हे याप्रकरणी पोलिसात गेले आहेत. व्ही/जे/७३१ – ही मीटर केबिन आहे. रहिवासी म्हणून तिथे कोणीही राहत नाही, परंतु एस.आर.एतील अधिकाऱयांनी या मीटर केबिनला घर नंबर दिला आणि त्या नंबरवर घर मिळवण्यासाठी दोन जणांमध्ये स्पर्धा सुरू आहे. व्ही/जे/७७६/ मंदिरावर हा घर नंबर टाकून त्यावर घर मिळवण्याचा प्रयत्न ओम शक्ती समाजाच्या एका व्यक्तीकडून सुरू आहे.

स्वतंत्र समितीकडून चौकशी सुरू

शताब्दी नगर प्रकरणात चौकशीसाठी स्वतंत्र त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने चौकशीसाठी थोडा वेळ जाणार आहे. संबंधित सर्व फाईल्सची तपासणी सुरू आहे. म्हाडाकडून झालेला सर्व्हे, नकाशा व अन्य कागदपत्रांची पडताळणी समिती करत आहे, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विपिन पालिवाल यांनी सांगितले.

Comments are closed.