धर्मेंद्र प्रधान बिहार निवडणूक प्रभारी
भाजपकडून नियुक्ती : प. बंगालमध्ये भूपेंद्र यादव तर तामिळनाडूत बैजयंत पांडा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भाजपने बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बिहारसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे, तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांना सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. शिवाय, भाजप खासदार बैजयंत पांडा यांना तामिळनाडूमध्ये प्रभारी आणि मुरलीधर मोहोळ यांना सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.
बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून तिथे सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वातील जेडीयू आणि भाजप यांचे युती सरकार सत्तेत आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मार्च ते मे 2026 दरम्यान निवडणुका होतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील तृणमूल काँग्रेस सत्तेत आहे. तर तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) सत्तेत आहे. पुढील वर्षी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी होणार असून भाजपने आतापासूनच तयारी केल्याचे दिसून येत आहे. बिहार विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची अपेक्षा आहे. 6 ऑक्टोबरनंतर कधीही विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये पुढीलवर्षी निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी भाजपने तिन्ही राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी नियुक्त केले आहेत. बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडीमध्ये जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.