पानिपुरीसाठी 'धार्ने'
कोणाच्या भावना कोणत्या घटनांमुळे दुखावतील आणि तसे झाल्यास ती व्यक्ती कशाप्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करेल, याचे अनुमान काढणे कठीण आहे. सध्या सोशल मिडियावर अशाच प्रकारची एक घटना प्रसारित होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसावे की रडावे, हेच समजेनासे झाले आहे. हा व्हिडीओ सध्या ‘एक्स’ च्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होत आहे. ही घटना अतिशय स्वारस्यपूर्ण आहे.
ही महिला एका पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी घेण्यासाठी गेली होती. तिने एक प्लेट पाणीपुरी मागविली. तिला बशीत घालून ती देण्यात आली. एका बशीत सहा पाणीपुऱ्या दिल्या जातात. या महिलेल्या बशीत केवळ चारच पाणीपुऱ्या होत्या. उरलेल्या दोन नंतर बशीत घातल्या जातील, या समजुतीने तिने त्या चार पाणीपुऱ्या खाल्ल्या आणि उरलेल्या दोनची मागणी गाडीवाल्याकडे केली. तथापि, त्याने दोन पाणीपुऱ्या देण्यात नकार दिला. या महिलेने त्या विक्रेत्याला सहा पाणीपुऱ्यांसाठी 20 रुपये दिले होते. तथापि, त्याने 20 रुपयांमध्ये चारच पाणीपुऱ्या येऊ शकतात, असे स्पष्ट करत ऊर्वरित दोन पाणीपुऱ्या देण्यास नकार दिला. त्यामुळे या महिलेचा पारा चढला. तिने त्या विक्रेत्याशी जोरदार भांडण केले. पण त्यानेही माघार घेण्यास नकार दिल्याने तिचा संताप आणखी वाढला. या भरात तिने चक्क या पाणीपुरीवाल्याच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रारंभ केला. भर मार्गात ही महिला पाणीपुरीच्या गाडीसमोर ‘धरणे’ देण्यासाठी बसली. हे पाहून तिच्या भोवती बघ्यांचा जमाव जमा झाला. तिच्या या ‘पाणीपुरी आंदोलना’चा परिणाम काय झाला, ही बाब समजू शकली नसली, तरी तिचे हे ‘धरणे’ सध्या सोशल मिडियावर चांगलेच गाजत आहे. असंख्य लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ही महिला अतिशय हिशेबी आहे. आम्ही पाणीपुरी खाताना किती पुऱ्या बशीत घातल्या गेल्या, याची गणनाही करत नाही. चवदार पाण्याने भरलेल्या पुऱ्या बशीत आल्या, की त्या तोंडात लोटायच्या एवढेच भान आम्हाला असते. या महिलेने मात्र, पाणीपुऱ्यांची संख्या मोजून त्यांचा आस्वाद घेतला, हे कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया एका दर्शकाने व्यक्त केली आहे. सध्या हे ‘पाणीपुरी आंदोलन’ सोशल मिडियावर बरेच गाजत असून या महिलेला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.
Comments are closed.