धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात संतापाची लाट! नागपूरसह राज्यभरात निदर्शने
छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते आणि त्यांनी समर्थ रामदासांकडे जाऊन आपण राज्यकारभार सांभाळा अशी प्रार्थना केली होती, असे वादग्रस्त विधान करणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात आज महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी शिवप्रेमींनी निदर्शने करत धीरेंद्र शास्त्रीचा तीव्र निषेध केला. प्रतिमेला जोडे मारले. त्याचवेळी महाराष्ट्रात पाय ठेवल्यास जोडय़ांचा प्रसाद देऊ, असा इशाराही संतप्त शिवप्रेमींनी दिला.
धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे विधान केले होते. त्याचे पडसाद आज महाराष्ट्रभरात उमटले. राजकीय, सामाजिक, कला, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांमधून नागपूरच्या महालमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ासमोर शिवसेनेच्या वतीने धीरेंद्र शास्त्रीचा जाहीर आणि तीव्र निषेध करण्यात आला. धीरेंद्र शास्त्री यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
खबरदार! जर आमच्या राजांचा अपमान कराल तर गाठ शिवसैनिकांशी आहे, असा इशारा यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी दिला. प्रसिद्धीसाठी इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अशा प्रवृत्तींचा माज उतरवण्यासाठी आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवप्रेमी सक्षम आहोत, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख संदीप रियाल पटेल, शहरप्रमुख हरिभाऊ बनाईत, विक्रम राठोड, महिला आघाडी संपर्कप्रमुख अजुषा बोधनकर तसेच युवासेना, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
सत्तांतर झाल्यापासून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची हिंमत वाढली – शशिकांत शिंदे
राज्यात अलीकडच्या काळात सत्तांतर झाल्यापासून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची हिंमत कमालीची वाढली आहे, हे सर्व ठरवून केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘आम्हीच घडवलं’ किंवा ‘आम्हीच त्यांचे गुरू होतो’ असे भासवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. शिवराय स्वयंभू होते आणि राजमाता जिजाऊसाहेबांच्या संस्कारांतून घडलेले जाणते राजे होते, हे विसरणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे लेकरू आई-बापापूर्वी महाराजांना ओळखते – अंबादास दानवे
महाराष्ट्रात येऊन येथील लोकांना छत्रपती शिवाजी महाराज ‘शिकवण्याचा’ हा धंदा नवा नाही. महाराष्ट्रात लेकरू आई-बापाला ओळखण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखू लागते, हे या वाचाळांना बहुदा ठाऊक नसावे! तसेच, वणी-दिंडोरीच्या लढाईत महाराज स्वतः बख्तर चढवून रणांगणात उतरले होते आणि त्यांनी सहा तास अविश्रांत झुंज दिली होती, याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. कोणाला हवे असतील तर ते आम्ही जरूर पाठवून देऊ, असे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
ढोंगी बागेश्वरला संत परंपरेशी जोडताना फडणवीसांना लाज वाटली पाहिजे – हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भोंदू बागेश्वरचा उल्लेख साधू संत असा केल्याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ढोंगी बागेश्वर बाबाला महाराष्ट्राच्या संत परंपरेशी जोडताना देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आम्हाला ‘शिवराय’ शिकवू नये – अमोल कोल्हे
‘मुघली आक्रमणासमोर उत्तर हिंदुस्थानने पळी पंचपात्र दडवून मान झुकवलेली असताना, सह्याद्रीच्या कातळावर तलवारीच्या पात्याने इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरेतून येऊन चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये. शिवविचारांवर पिंड पोसलेल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आराध्य दैवत नाहीत तर आमची अस्मिता, स्वाभिमान आणि ओळख आहेत… काल, आज आणि उद्याही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
महाराजांबद्दल कोणतेही अपशब्द खपवून घेणार नाही – रितेश देशमुख
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वापरलेले कोणतेही अपशब्द किंवा आक्षेपार्ह विधाने शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत, असे अभिनेते रितेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे पह्ल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे.. प्रौप्रतापपुरंदर…क्षत्रियकुलावतंस… सिंहासनाधिश्वर… महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज, असे ट्विटही रितेशने केले आहे.
या भोंदूला महाराष्ट्रात बंदी घाला – संभाजीराजे
धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे तेथील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो आणि लोक टाळय़ा वाजवजात, हे दुर्दैवी आहे. अशा भोंदूंना मोठे करणाऱ्यांना सरळ केले पाहिजे. या बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
बागेश्वरबाबांकडून जाहीर माफी
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानावरून वाद निर्माण झाल्याने आज जाहीर माफी मागितली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून हिंदू राष्ट्राची प्रेरणा घेतली त्यांचा अवमान करण्याचा विचार माझ्या मनामध्येही येणार नाही, असे ते म्हणाले. आपल्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. गुरुंप्रती शिवरायांचा भाव काय होता, संतांच्या प्रती त्यांचा भाव काय होता ते मी माझ्या भाषेत सांगितले, असेही ते म्हणाले.
Comments are closed.