एमएस धोनी तर जीनियस आहे! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितला रोचक किस्सा

एमएस धोनी (MS Dhoni) हा क्रिकेट इतिहासातील सर्वात महान यष्टिरक्षकांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आपल्या करिअरमध्ये त्याने तब्बल 195 वेळा फलंदाजांना स्टंपआऊट केले आहे. 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली एक स्टंपिंग तर धोनीच्या यष्टिरक्षक कौशल्याला आणखी उंची देणारी ठरली. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अॅलेक्स केरीने (Alex carey) त्या घटनेची आठवण सांगताना एमएस धोनीला “जिनिअस” म्हटलं आहे.

ही गोष्ट आहे 29 जानेवारी 2016 ची. मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात टी20 सामना खेळला जात होता. भारताने दिलेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियन संघ करत होता. जेम्स फॉकनर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि तोपर्यंत त्याने 10 धावा केल्या होत्या. 17 व्या षटकात रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. त्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फॉकनरच्या बॅटचा आतला कड लागला आणि चेंडू थेट धोनीच्या पॅडला लागून स्टंपला धडकला. धोनीची नजर एवढी तीक्ष्ण होती की फॉकनरचा पाय हवेत गेला आहे हे त्याने लगेच पाहिलं आणि अपील केलं. निर्णय फलंदाज बाद असल्याचं झालं.

जेम्स फॉकनरच्या बॅटला लागलेला चेंडू, त्यानंतर धोनीच्या पॅडवरून जाऊन थेट स्टंपला लागणं, हे सगळं क्षणभरात घडलं. बघायला गेलं तर हे केवळ योगायोगासारखं वाटतं. पण अॅलेक्स केरीचं म्हणणं आहे की धोनीने मुद्दाम असंच करावं अशीच त्यांची योजना होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये अॅलेक्स केरी (Alex carey) म्हणतो, धोनी एक जीनियस आहे. त्याने हे सगळं जाणीवपूर्वक केलं होतं, कारण तो एमएस धोनी आहे.

Comments are closed.