संघ निवडीपूर्वी ध्रुव जुरेलचे मोठे विधान, आपल्या यशाबाबत केला मोठा खुलासा!

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. त्यासाठी सर्व खेळाडू विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करून आपला दावा मांडत आहेत. या यादीत यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलचाही समावेश आहे. जुरेलला वनडे संघात आपले स्थान टिकवून ठेवायचे आहे.विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर जुरेलने एक मोठे विधान केले असून आपल्या यशामागचे कारणही सांगितले आहे.

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये ध्रुव जुरेलने 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे. या काळात जुरेल अत्यंत आक्रमक शैलीत खेळला आहे, ज्याबद्दल त्याने आता उघडपणे भाष्य केले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना जुरेल म्हणाला, “मी स्वतःसाठी खूप मोठी उद्दिष्टे निश्चित करत नाही. मी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. विजय हजारे ट्रॉफीपूर्वी जेव्हा मला थोडा वेळ मिळाला, तेव्हा मी 4-5 तास फलंदाजी करायचो आणि मनात वेगवेगळे प्रसंग तयार करून सराव करायचो. निकाल आणि निवड काहीही असो, माझी मेहनत माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच मी कठोर परिश्रम करतो. याच मेहनतीने मला इथपर्यंत पोहोचवले आहे आणि पुढेही घेऊन जाईल.”

न्यूझीलंडविरुद्ध जेव्हा भारतीय वनडे संघाची घोषणा होईल, तेव्हा ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांपैकी एकालाच संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. यशस्वी जयस्वालला संघातून बाहेर करणे कठीण आहे, अशा परिस्थितीत एका यष्टिरक्षक फलंदाजाला डच्चू दिला जाऊ शकतो. वनडे क्रिकेटमध्ये के.एल. राहुल हा संघाची पहिली पसंती असणार आहे, तर दुसरा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सध्या ध्रुव जुरेल शर्यतीत आघाडीवर दिसत आहे. रिषभ पंतच्या जागी संघात कर्णधार शुभमन गिलची एन्ट्री होऊ शकते.

Comments are closed.