चोरीच्या संशयावरुन धुळ्यात चिमुकल्याला बैलगाडीला बांधून खालून जाळ लावला, म्हणाले, ‘मेला तर जेसी
धुळे क्राईम न्यूज: धुळ्यातील शिरपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरुन एका लहान मुलाला अमानुषपणे मारहाण केल्याची आणि त्याच्या अंगाला चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील (Dhule news) शिरपूर तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे. ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय घेऊन 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण (Kidnapping) करून त्यास लोखंडी बैलगाडीला बांधून मारहाण करत खालून जाळ लावण्यात आला. या घटनेत आगीच्या चटक्यांनी गंभीररित्या भाजलेल्या मुलावर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरपूर-जळोद रस्त्यालगतच्या भामपूर शेती शिवारात वीटभट्टी जवळ घडलेल्या या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिरपूर तालुक्यातील सातपूर येथील अल्पवयीन पिडीत मुलगा अचानक गायब झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीने सर्वांना मोठा धक्का बसला.
या मुलाचे नाव हिमांशु असे असून त्याच्या वडिलांनी पोलिसांत याबाबत फिर्याद दाखल केली. पोलीस तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील चिंतामण उर्फ चिंतू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी हिमांशु यास जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याचे अपहरण केले. यानंतर त्याला शिरपूर-जळोद रस्त्यावरून शेतातील वीटभट्टी परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला मारहाण करून एका लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आले. या क्रूरतेनंतर दोन्ही संशयितांनी बैलगाडीच्या खाली जाळ पेटवला. गाडीखाली लावण्यात आलेल्या आगीमुळे लोखंडी पत्रा तापला आणि हिमांशू गंभीररित्या भाजला. त्याने ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत. मी आणून देतो, असे सांगत गयावया केली. आणि दोघांच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतली. घरी परतल्यावर आई-वडिलांना त्याने घटना सांगितल्यावर संपूर्ण प्रकार उघड झाली आहे. अल्पवयीन मुलांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फ चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि हिमांशू याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह बालसंरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
Dhule news: ‘मेला तर जेसीबीने खड्डा खणून गाडून टाकू’
या मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या मामाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याने सांगितले की, माझ्या भाच्याला शेतात घेऊन जाऊन हे सर्व करण्यात आले. त्याला खाली आग लावून चटके देण्यात आले. त्याला मारुन टाकण्याचीही धमकी दिली. ट्रॅक्टरच्या लाईट चोरल्याची कबुली देत नाही तोपर्यंत त्याला चटके देण्यात आले. हा मेला तर जेसीबीने खड्डा खणून त्याला दाबून टाकू, असेही मारहाण करणाऱ्यांनी म्हटल्याचे मुलाच्या मामाने सांगितले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.