‘धुरंधर २’ चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अवघ्या १८ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रणवीर सिंग अभिनित ‘धुरंधर २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सतत नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई करत बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. आता प्रदर्शनाच्या १८ व्या दिवशी या चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचला असून अवघ्या १८ दिवसांत या चित्रपटाने १००० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. प्रेक्षकांचे मिळत असलेले प्रेम पाहता, येणाऱ्या दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी मोठे विक्रम करेल असे दिसत आहे.

‘धुरंधर २’ १००० कोटींच्या पार

‘धुरंधर २’ ने प्रदर्शनाच्या अठराव्या दिवशीही रेकॉर्डतोड कमाई केली आहे. ट्रेड डेटा वेबसाइट ‘सॅकनिल्क’च्या माहितीनुसार, अठराव्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत या चित्रपटाने २७.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या आकडेवारीसह चित्रपटाची हिंदुस्थानातील एकूण कमाई १०१२ कोटी रुपये झाली आहे. अवघ्या १८ दिवसांत हिंदुस्थानात १००० कोटींहून अधिक नेट कलेक्शन करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला असून, या चित्रपटाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

एकेकाळी हिंदुस्थानात चित्रपटांसाठी १०० कोटींची कमाई करणेही कठीण मानले जात होते. मात्र, आजच्या काळात अनेक चित्रपट १०० कोटींचा टप्पा सहज पार करत आहेत. परंतु निव्वळ हिंदुस्थानात १००० कोटींची कमाई करणारा ‘धुरंधर २’ हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे.

Comments are closed.