आर्यनला सोडण्यासाठी शाहरुखकडे पैसे मागितले नाहीत, हायकोर्टात समीर वानखेडेचा दावा; सीबीआयने नोंदवलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी
क्रॉडिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची सुटका करण्यासाठी अभिनेता शाहरुख खानकडे पैसे किंवा लाच मागितली नव्हती, असा दावा आयआरएस अधिकारी समीर वानखेडेकडून सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.
आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच घेतली गेल्याचा ठपका ठेवत सीबीआयने एनसीबीच्या अधिकाऱयांविरोधात भ्रष्टाचार व लाचेचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी समीर वानखेडेने याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. सुमन शाम यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. अॅड. आबाद पौंडा यांनी वानखेडे यांची बाजू मांडली. वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानकडे लाच किंवा पैसे मागितल्याचा कोणताच पुरावा सीबीआयकडे नाही, असे अॅड. पौंडा यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली.
काय आहे प्रकरण…
क्रुझवर रेव्ह पार्टी सुरू असल्याचे कळताच एनसीबीच्या पथकाने तेथे छापा मारला. या पथकाचे प्रमुख वानखेडे होते. यात आर्यन खानला अटक झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले. नंतर आर्यन खानची पुराव्यांअभावी सुटका करण्याचा निर्णय एनसीबीने घेतला. याची चौकशी करत सीबीआयने एनसीबीच्या अधिकाऱयांविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला.
Comments are closed.