IND vs ENG: भारताच्या विजयाआधी मोहम्मद सिराजचं टोटकं आलं कामी? पाचव्या टेस्टपूर्वी केलं खास काहीतरी!
भारताने केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळलेल्या अत्यंत थरारक अशा शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा 6 धावांनी पराभव केला. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी फक्त 35 धावा लागल्या होत्या आणि त्यांच्या हातात अजून चार खेळाडू शिल्लक होते. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथ मैदानावर होता, पण भारताच्या वेगवान गोलंदाजाने काही वेगळंच ठरवलं होतं. मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) या चारपैकी तीन विकेट घेतल्या आणि भारताला शेवटचा कसोटी सामना जिंकून दिला.
भारताच्या विजयानंतर मोहम्मद सिराजने सांगितलं की, आज सकाळी उठल्यावर मी स्वतःलाच सांगितलं की, हा सामना मला जिंकायचाच आहे आणि मी ते नक्की करू शकतो. सिराजने पुढे सांगितलं की, मी माझा फोन वॉलपेपर बदलला आणि त्यावर लिहिलं, मी हे करू शकतो. भारताला जिंकवण्यासाठी आणि स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी सिराजने आपला फोन वॉलपेपरच बदलला आणि त्याचं ते टोटकं कामालाही आलं.
पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये जेमी स्मिथला बाद करत भारताच्या विजयाकडे पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर जेमी ओव्हर्टनलाही त्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने जोश टंगला बाद केलं.
आता इंग्लंडला विजयासाठी 17 धावांची गरज होती आणि एटकिन्सनने मारलेल्या षटकारामुळे ती गरज 11 वर आली. भारताला फक्त एक विकेट हवी होती आणि इंग्लंडला दोन फटके. अशातच सिराजने एटकिन्सनला क्लीन बोल्ड केलं आणि भारताला ही रोमांचक लढत जिंकून दिली. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली.
Comments are closed.