Asia Cup: आशिया कपसाठी स्वतःलाच निवडीची अपेक्षा नव्हती, तरीही झाला संघात समावेश! या खेळाडूची प्रतिक्रिया
भारतीय फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) म्हणाला की, त्याला आशिया कप 2025 (Asia Cup 2025) च्या टीममध्ये निवड होईल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. यूपी टी20 लीगदरम्यान रेव्ह स्पोर्ट्सशी बोलताना रिंकूने सांगितले की, अलीकडे त्याचा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधला फॉर्म काहीसा चांगला नव्हता, त्यामुळे निवडीबाबत त्याला विश्वास नव्हता.
आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे, आणि भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळवला जाईल.
रिंकू म्हणाला की, निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने सांगितले, माझं नाव आशिया कप संघात आलं तेव्हा मला प्रचंड मोटिव्हेशन मिळालं. गेल्या वर्षी माझं प्रदर्शन चांगलं नव्हतं, मला वाटलं होतं की कदाचित मी बाहेर पडेन. पण निवडकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिली. त्यामुळे माझा आत्मविश्वास परत आला आणि यूपी टी20 लीगमधली माझी खेळी मला आणखी मजबूत करून गेली.
भारतीय संघात नाव आल्यानंतर लगेच रिंकूने यूपी टी20 लीगमध्ये आपलं पहिलं टी20 शतक ठोकलं. मेरठ मॅव्हरिक्सकडून खेळताना त्याने 168 धावांचा पाठलाग करताना धडाकेबाज खेळी केली. संघाने सुरुवातीच्या 8 षटकांत 4 गडी गमावले होते आणि दडपणात होता, तेव्हा रिंकूने जबरदस्त खेळ केला. त्याने केवळ 48 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या.
रिंकू म्हणाला की, तो गोलंदाजीमध्ये 1–2 षटके टाकू शकतो, आणि कदाचित हेच त्याच्या निवडीचं एक महत्त्वाचं कारणं ठरलं. त्याने सांगितले की, सध्या निवडकर्ते अशा खेळाडूंना प्राधान्य देत आहेत जे एकापेक्षा जास्त भूमिका बजावू शकतात.
रिंकूने पुढे सांगितले, आजच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी खूप महत्त्वाची झाली आहे. निवडकर्त्यांना हवे आहे की खेळाडू किमान दोन भूमिका निभावू शकतील. जर तुम्ही फलंदाजीने सामना बदलू शकत नसाल, तर गोलंदाजीने योगदान द्या.
Comments are closed.