अडचणीच्या काळात इराणला साथ दिली नाही, भविष्यात याचा त्रास होणार – राज ठाकरे

काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होतायत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे असे म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “देशामध्ये येणारं सगळं बरंचसं तेल हे इराणमधनं येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले. पुढचं मला माहीत नाही. पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही. जो देश आजपर्यंत जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, हिंदुस्थानला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात आपल्याला होणार.”

राज ठाकरे म्हणाले, “आज सगळ्या बाजूनी समजतच नाही की, नेमकं आपण कुठे चाललो आहोत, काय चाललं आहोत. या देशामधली राज्यं कुठे चालली आहेत, या देशामधली लोकं कुठे चालली आहेत, प्रगती कुठे होतीये? मी आत्ताच गेल्या जानेवारीमध्ये आपली इथे जाहीर सभा झाली, त्यावेळेला मी अनेक लोकांचे वाभाडे काढले इथे. आपण पण किती अडाणी आहोत हे पण सांगितलं.”

ते पुढे म्हणाले की, मी ज्यावेळेला राजकारणामध्ये आलो, त्यावेळेला माझं पहिलं जेव्हा भाषण झालं आणि त्या पहिल्या भाषणानंतर ज्यावेळेला मला आदरणीय बाळासाहेबांनी बोलवलं, एकेक वाक्यं सांगितली होती त्यावेळेला काही काही… जसं स्क्रू फिट व्हावा ना तशी आतमध्ये गेली ती वाक्यं. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की, “भाषण जेव्हा करशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, काय बोललास याला महत्त्व नाही, आज तू येऊन त्यांना काय दिलंयस याला महत्त्व आहे. समोरच्यांना विचार करायला काय दिलंस?”

राज ठाकरे म्हणाले की, “मी नेहमी एक भाषण करताना माझ्यावरती एक मानसिक दडपण पण असतं, की मी आज काय तुम्हाला देऊ, काय सांगू तुम्हाला नवीन काय देऊ, ज्याच्यातनं तुम्ही विचार करायला लागाल, हे सरकार विचार करायला लागेल. पण आज तुम्हाला सगळ्यांना, देशालाच अख्ख्या, करमणुकीमध्ये गुंतवून ठेवलंय, करमणुकीमध्ये. आयपीएल चालू आहे, मग अजून कुठचे तरी पिक्चर येतायत, मग ते हाऊसफुल्ल जातायत, मग टेलिव्हिजनवरती… मी आज तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करणार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे… पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इन्स्टाग्राममधनं बाहेर या.”

Comments are closed.