Nanded News – आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा नांदेड जिल्ह्यात डिझेल टंचाई, पेट्रोल पंपावर रांगाच रांगा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नांदेड शहर व जिल्ह्यात आठवडा भरानंतर पुन्हा डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. भरउन्हात डिझेलच्या टँकरची वाट बघत शेतकरी, ट्रॅक्टर चालक व वाहन धारक ताटकळत उभे आहेत.

मराठवाड्यातील जवळपास पाच जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून डिझेल टंचाई भासत आहे. यामुळे सर्व शेतकरी तसेच वाहन धारक त्रस्त झाले आहेत. आता हे लोण नांदेड जिल्ह्यात पोहंचले आहे. कालपासून जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर नो डिझेलचे बोर्ड लागले आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरु असून, पेरणीची तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, लोहा, कंधार, भोकर, किनवट, माहूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. ट्रॅक्टरव्दारे पेरणी करण्यासाठी जमिनीची नांगरणी व लेव्हलींग सुरु आहे. तसेच हळद आणि उसाचे पिक काढल्यानंतर जमिनीला पलटी मारण्याचे काम सुरु आहे. मात्र काल सायंकाळपासून जिल्ह्यातील ७० टक्के पेट्रोलपंपावर डिझेल उपलब्ध नसल्याने कॅन घेऊन शेतकरी रांगेत उभे आहेत. काही ठिकाणी पेट्रोलपंपावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर चालक उभे असून, चारचाकी वाहनांना देखील डिझेल मिळत नाही.भोकर तालुक्यातील ६० टक्के पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याच्या पाट्या लागल्या असून, डिझेलचे टँकर येण्याची वाट बघत शेतकरी रात्रीपासून थांबले आहेत. सोनारी, भोकर, बारड, पिंपळगाव, पार्डी, अर्धापूर, मुदखेड, नायगाव तालुक्यातील चार पंप तसेच लोहा व कंधार तालुक्यातील अनेक पंपावर डिझेल उपलब्ध नाही. ऐन पेरणीच्या हंगामाच्या वेळी डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी मात्र त्रस्त आहेत. याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, लोक पॅनिक झाले असून, स्टॉक करुन घेण्याची घाई ग्राहकांना लागली असल्याने हि टंचाई कृत्रिम असल्याचे सांगून पुरेसा डिझेल साठा जिल्ह्यासाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कॅन घेऊन शेतकरी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. त्यांनी चिंता करु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान सध्या किनवट तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी डिझेल हीच जीवनवाहिनी बनली असून, त्यातच अडथळा आल्याने शेतकर्‍यांच्या आशांवर संकटाचे गडद सावट पसरले आहे. पावसाळ्यापूर्वीच्या शेती कामांची मशागतीची लगबग सुरू असतानाच किनवट तालुक्यावर डिझेल टंचाईचे काळे ढग दाटून आले आहेत. ट्रॅक्टर, डिझेल पंप आणि शेती यंत्रणा अक्षरश ठप्प होण्याच्या मार्गावर असून, ऐन शेती हंगामात शेतकरी मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहेत. पेट्रोल पंपांवर रात्रभर नागरिकांच्या आणि कॅन घेऊन आलेल्या शेतकर्‍यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा कमालीचा अपुरा पडत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दोन दिवसांपासून ताटकळत राहावे लागत आहे.

Comments are closed.