स्टार्टअप्स आणि एमएसएमई एंटरप्राइजेसना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उघडला सरकारशी थेट संवादाचा मार्ग : स्वतंत्र सल्लगार गटाची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशातील स्टार्टअप आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने नवी पुढाकार घेण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी मंगळवारी स्टार्टअप आणि एमएसएमई उद्योगांसाठी स्वतंत्र सल्लागार गट स्थापन करण्याची घोषणा केली. या गटातील सदस्य नियमितपणे मंत्र्यांसोबत बैठका घेऊ शकतील. यामध्ये उद्योजकांना त्यांच्या व्यवसायातील अडचणी, गरजा आणि आव्हाने थेट सरकारसमोर मांडता येणार आहेत.

भारतीय कंपन्यांना व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे आणि दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची जागतिक ओळख मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

उद्योगांच्या समस्या थेट सरकारसमोर मांडता येणार

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित टेलिकॉम स्टार्टअप्स आणि एमएसएमइं कॉन्क्लेव्हमध्ये सिंधिया यांनी ही घोषणा केली. दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्या (टीएसपी), उपकरण उत्पादक कंपन्या (ओईएम), इंटरनेट सेवा पुरवठादार (आयएसपी) तसेच संशोधन आणि शैक्षणिक संस्थांसाठी यापूर्वीच सल्लागार गट स्थापन करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर आता स्टार्टअप आणि एमएसएमई क्षेत्रासाठीही स्वतंत्र गट तयार करण्यात येणार आहे. या गटाच्या नियमित बैठका होतील. त्यामध्ये उद्योजकांना त्यांच्या व्यवसायातील अडचणी आणि सरकारकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबत थेट चर्चा करता येईल. या सूचनांच्या आधारे सरकार पुढील धोरणात्मक निर्णय घेणार आहे.

सरकार मदत करणार

सिंधिया यांनी स्पष्ट केले की, सरकारची भूमिका केवळ नियम तयार करण्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर उद्योजकांना व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करण्याचीही असेल. यामुळे भारतीय कंपन्यांना नवीन उत्पादने विकसित करणे, ती बाजारपेठेत आणणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे सोपे होईल. भारताने केवळ इतर देशांचे तंत्रज्ञान वापरणारा देश बनून राहू नये. भारतीय कंपन्यांनी स्वत: नवीन तंत्रज्ञान विकसित करून जगभरातील बाजारपेठांमध्ये आपली उत्पादने आणि सेवा पोहोचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

80 कंपन्यांची 96 उत्पादने बाजारपेठेत दाखल होण्यास सज्ज

दूरसंचार विभागाच्या डिजिटल कम्युनिकेशन इनोव्हेशन स्क्वेअर (डीसीआयएस) योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 200 गुंतवणुकी करण्यात आल्या आहेत. यापैकी 80 कंपन्यांची 96 उत्पादने व्यावसायिक वापरासाठी तयार झाली आहेत, अशी माहिती सिंधिया यांनी दिली. म्हणजेच या कंपन्यांनी केवळ नवीन कल्पना मांडल्या नाहीत, तर त्यांचे प्रत्यक्ष बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकणाऱ्या उत्पादनांमध्ये रूपांतर केले आहे. सरकार भविष्यातही सुऊवातीच्या टप्प्यातील गुंतवणुकीचे हे मॉडेल सुरू ठेवणार आहे. यासाठी सीड फंडिंगसोबतच नव्या सल्लागार गटाची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय टीटीडीएफ आणि टीडीआयपी यांसारख्या योजनांमधूनही स्टार्टअपना मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

एका दशकात ब्रॉडबँड कनेक्शन 6 कोटींवरून 100 कोटींच्या पुढे

भारतातील दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करताना सिंधिया यांनी महत्त्वाची आकडेवारी सादर केली. सुमारे दहा वर्षांपूर्वी देशात ब्रॉडबँड कनेक्शनची संख्या जवळपास 6 कोटी होती. आता ती वाढून 100 कोटींच्या पुढे गेली आहे. देशात सध्या सुमारे 133 कोटी मोबाइल कनेक्शन आणि 50 कोटी 5जी वापरकर्ते आहेत. भारत आता पुढील पिढीच्या दूरसंचार तंत्रज्ञानासाठी म्हणजेच 6जी साठीही तयारी करत आहे. भारत 6जी अलायन्सच्या माध्यमातून जागतिक स्तरावर 6जी तंत्रज्ञानाचे मानदंड निश्चित करण्यात भारताची भूमिका अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

Comments are closed.