साणंदमध्ये डिजिटल क्रांतीची सुरुवात

पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन : 22,516 कोटी खर्चून उभारणी

वृत्तसंस्था/ साणंद (गुजरात)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग (एटीएमपी) सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. 10-11 वर्षांपूर्वीपर्यंत भारतात डेटा आणि चिप्सबद्दल फारशी चर्चा होत नव्हती. पूर्वी देश प्रामुख्याने सॉफ्टवेअरसाठी ओळखला जात होता, परंतु आज, भारत हार्डवेअर उत्पादनासाठी देखील ओळखला जात असून आता साणंदमधील प्रकल्पाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांतीला सुरुवात होत असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया सेमीकंडक्टर मिशनचा हा पहिला प्रकल्प आहे.

साणंदमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणीसाठी जून 2023 मध्ये सामंजस्य करार झाला. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये काम सुरू झाले आणि फेब्रुवारी 2026 मध्ये येथे उत्पादन सुरू झाले. या प्रकल्पाची उभारणी अतिशय वेगवान गतीने करण्यात आली आहे. हा प्रकल्प मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सचे पहिले व्यावसायिक उत्पादन आणि शिपमेंट म्हणून ओळख निर्माण करणारा ठरला आहे. हा प्रकल्प 22,516 कोटी खर्चून बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी एका सभेलाही संबोधित केले.

एटीएमपी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प

साणंदमधील सेमीकंडक्टर प्रकल्प ‘एटीएमपी’ (असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग) तंत्रज्ञानावर आधारित आहे. सेमीकंडक्टर चिप्स असेंबल, टेस्ट, मार्किंग आणि नंतर पॅकेज केल्या जातील. या पद्धतीमुळे देशात सेमीकंडक्टर उत्पादन मजबूत होईल आणि देश तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. आतापर्यंत भारत मायक्रोचिप्ससाठी आयातीवर अवलंबून होता. या प्रकल्यामुळे देशात तांत्रिक विकास, गुंतवणूक आणि रोजगाराचे नवे मार्ग खुले होतील. यामुळे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’सारख्या उपक्रमांनाही गती मिळेल, असा दावा पंतप्रधानांनी केला आहे. भारत आता केवळ जगातील सॉफ्टवेअर हब राहणार नाही, तर हार्डवेअर जगात आपली ताकद दाखविण्यासही सज्ज आहे. ही केवळ एका कारखान्याची सुरुवात नाही तर भारताची पहिली व्यावसायिक-स्तरीय सेमीकंडक्टर युनिट जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा बदलेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

अवघ्या अडीच वर्षात प्रकल्पाची उभारणी

जून 2023 मध्ये पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीदरम्यान मायक्रोनसोबत करार झाला तेव्हा या सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी प्लांट प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. अवघ्या अडीच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होऊन उत्पादनासाठी तयार झाला आहे. या प्रकल्पातील एकूण गुंतवणूक अंदाजे 22,516 कोटी रुपये इतकी आहे. या मायक्रोन प्लांटमुळे गुजरात आणि देशातील तरुणांना रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. या प्लांटमुळे अंदाजे 5,000 थेट नोक्रया निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रात अंदाजे 15,000 अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. महत्त्वाचे म्हणजे, या प्लांटमध्ये ऑपरेटर आणि तंत्रज्ञ म्हणून मोठ्या संख्येने दिव्यांग लोकांना संधी देण्यात आल्या आहेत.

Comments are closed.