दिपू दास यांच्या हत्येचा मान्यवरांकडून निषेध.

बांगलादेशात हिंदूंचे संरक्षण करण्याची केली मागणी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

चित्रपट तसेच कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांसंबंधी चिंता व्यक्त केली असून अशा घटनांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. दिपू चंद्र दास यांची निर्घृण हत्या मानवतेला काळिमा फासणारी आहे, अशी प्रतिक्रिया या मान्यवरांनी व्यक्त केली आहे. गाझा पट्टीवर कोणी हल्ला केला की, मानवतेच्या नावाने गळा काढणारे पुरोगामी बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्यांसंबंधी मिठाची गुळणी धरून गप्प का आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला असून हिंदूंचे संरक्षण होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे.

चित्रपट अभिनेत्या जान्हवी कपूर आणि काजल अग्रवाल यांनी दिपू चंद्र दास यांच्या हत्येचा कठोर भाषेत निषेध केला असून या हत्यांचे उत्तरादायित्व बांगलादेश प्रशासनावरच असल्याची स्पष्टोक्ती केली आहे. त्या देशाच्या प्रशासनाने हिंदूंच्या आणि अन्य अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी त्वरित पावले उचलावीत. तसेच दिपू दास आणि अन्य हिंदूंच्या मारेकऱ्यांना त्वरित जेरबंद करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळवून द्यावी, अशी मागणी जान्हवी कपूर यांनी शुक्रवारी केली.

गाझासंबंधी सहानुभूती, पण…

गाझापट्टीवर बाँबफेक होऊन काही जणांचे मृत्यू झाले की, अनेक कथित मानवतावाद्यांना मानवतेचे कढ येतात. अशा घटनांचा त्वरित निषेध केला जातो. तथापि, बांगलादेशात हिंदूंची हत्या तेथील धर्मांधानी केली, की तेथील हिंदूंना साधी सहानुभूतीही दाखविली जात नाही, अशी खोचक टीका प्रसिद्ध अभिनेता मनोज जोशी यांनी केली आहे. अशी प्रवृत्ती निषेधार्ह असून एकना एक दिवस याचे उत्तर मिळेलच, अशी टिप्पणीही मनोज जोशी यांनी शुक्रवारी केली आहे.

धर्माच्या नावाने मारहाण अयोग्य

बांगलादेशातील घटनांचे उत्तरदायित्व निश्चित होण्याची आवश्यकता आहे. धर्माच्या नावाने असा भीषण हिंसाचार करणे योग्य आहे काय, असा प्रश्न असून तो कोणीतही या धर्मांधांना विचारावयास हवा आहे. यापुढे गप्प बसून चालणार नाही, अशा अर्थाचे प्रतिपादन गायक टोनी कक्कर यांनीही शुक्रवारी केले.

आणखी एका हिंदूची हत्या

दास यांच्या हत्येनंतर 29 वर्षांचे अमृत तथा सम्राट मोंडाल यांचीही हत्या बांगलादेशातील एका खेड्यात करण्यात आली आहे. ही हत्याही दगडांनी ठेचून करण्यात आली आहे. मात्र, तेथील पोलिसांनी ही हत्या खंडणीखोरीतून झाली असल्याचा दावा करत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशात सव्वा वर्षांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर तेथील प्रशासनात कट्टर धर्मांधांचा प्रभाव वाढला असल्याने हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना धोका निर्माण झाला आहे.

Comments are closed.