खोटा गुन्हा दाखल करून प्रतिष्ठेला डाग लावला! दिलीप खेडकर गंभीर यांचा पोलिसांवर आरोप

नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या काँक्रीट मिक्सर ट्रक प्रकरणात पोलिसांनी खोटी माहिती देऊन जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप शासकीय अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकर यांनी केला. पोलिसांनी आमच्यावर आरोप लावून प्रतिष्ठेला काळा डाग लावला. आमच्या कुटुंबावर मानसिक, शारीरिक ताण आणला. हे सर्व राजकीय दबावातून घडवून आणले गेले आहे, असा आरोप खेडकर यांनी केला आहे. दिलीप खेडकर यांनी रविवारी अहिल्यानगरमध्ये पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेचा सविस्तर खुलासा केला.

खेडकर म्हणाले, पूजा ऑटोमोबाईल्सच्या मालकीच्या वाहनातून मुंबईहून पुण्याकडे येत असताना ऐरोली पुलाजवळ काँक्रीट मिक्सर ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर ट्रकचालक व हेल्पर यांनी माफी मागून पोलिसांत जाऊ नका, अशी आम्हाला विनंती केली.

त्यांची दया आल्याने आम्ही हेल्पर प्रल्हादकुमार याला सोबत घेऊन इन्शुरन्स प्रक्रियेसाठी पुण्याकडे आलो. रात्री उशीर झाल्याने गॅरेज बंद होते. दुसऱ्या दिवशी सुट्टीमुळे गॅरेज बंद असल्याने सकाळी ९.३० च्या सुमारास आम्ही हेल्परला बसस्थानकावर सोडून दिले. त्यानंतर दुपारी १.३० वाजता ट्रकमालकाने हेल्परचे अपहरण झाल्याची तक्रार रबाळे पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी कोणतीही पडताळणी न करता डॉ. मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप त्यांनी केला.

खेडकर म्हणालो, एफआयआरमध्ये पोलिसांनी खोट्या गोष्टींचा पाढा वाचला आहे. त्यामध्ये दुपारी १.३० वाजता बंगल्यावरून हेल्परला ताब्यात घेतले, पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, गरज नसताना गावातील आणि ऑफिसमधील लोकांना स्टेशनला बोलावून मारहाण, ‘खंडणी’चा गुन्हा दाखल करणे यासह हेल्परचे अपहरण झाले नसताना पोलिसांनी मुद्दाम अपहरण दाखविले आदींचा समावेश आहे, असे खेडकर म्हणाले.

या कारवाईमागे कोणाचा तरी दबाव आहे हे आता आपण उघड करणार आहे. तसेच पोलीस यंत्रणा कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहे, हे यातून सिद्ध झाले आहे. मला जामीन मिळाला असून, मी आता बाहेर आहे. मी कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही, मी काही पळकुटा नाही, असेही दिलीप खेडकर यांनी म्हटले आहे.

ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे या प्रकरणाची स्वतंत्र विभागीय चौकशी करून जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी केली असल्याचे सांगितले.

Comments are closed.