बुमराला सांगितलं असतं, आयपीएल खेळू नकोस

>> संजय खडे

दिलीप वेंगसरकर त्याच्या जमान्यातला दादा फलंदाज होता. हिंदुस्थानचा माजी कप्तान, निवड समितीचा अध्यक्ष दिलीप वेंगसरकरशी इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या अतिशय उत्पंठावर्धक ठरलेल्या मालिकेच्या अनुषंगाने केलेली ही बातचित… पाचपैकी केवळ तीन सामने खेळण्याची तयारी दाखवणाऱया जसप्रीत बुमराहला निवड समितीचा अध्यक्ष असतो तर निवडलच नसतं, असं परखड मत वेंगसरकर यांनी या मुलाखतीत व्यक्त केले.

मालिकेबद्दल काय म्हणशील?

‘फारच मस्त. प्रत्येक सामना पाच दिवस चालला. प्रत्येक सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशी लागला. प्रत्येक वेळी क्रिकेटवर प्रेम करणाऱयांनी भरभरून हजेरी लावली. एकूण कसोटी क्रिकेटचं महत्त्व अधिक वाढलं. अशा मालिका अपवादाने पाहायला मिळतात.’

ही मालिका आपण जिंकू शकलो असतो असं वाटतं का?

‘हो म्हणावं असं वाटतंय, पण व्हायचं होतं ते होऊन गेलंय. मला वाटतं, आपण नवा कप्तान, बरेचसे नवे खेळाडू घेऊन गेलो होतो. इंग्लंडमध्ये जिंकणं सोपं नसतं. त्यामुळे आपल्या खेळाडूंनी दाखवलेल्या विजिगिषु वृत्तीचं काwतुक करायला हवं. त्यांनी जबरदस्त कामगिरी केली.’

आपण मालिकेत 1-2 अशा पिछाडीवरून 2-2 अशी बरोबरी साधली…

सर्व श्रेय संघभावनेला द्यायला हवं. संपूर्ण मालिकेत आपल्या खेळाडूंनी छान कामगिरी केली. जयस्वाल, राहुल, गिल, पंत, जडेजा, वॉशिंग्टन, सिराज, बुमरा, प्रसिध, आकाशदीप… हर एक सामन्यात त्यांनी कठीण समयी आपापलं योगदान दिलं. गिल नवा कप्तान आहे, शिकेल, पण त्याच्या नेतृत्वाखाली ही संघभावना आपल्याला दिसली आहे. महत्त्वाचं म्हणजे, नेतृत्वाच्या जबाबदारीचा त्याच्या फलंदाजांवर परिणाम दिसला नाही. त्याने तर धावांचे विक्रमच केले!

ऋषभ पंतने चांगली कामगिरी केली आहेच. तरीही यॉर्करला उलटा फटका खेळणं, जखमी होणं त्याला आणि संघाला भोवलं असं म्हणशील?

तो एक प्रतिभावंत फलंदाज आहे खरा. पण त्याने कसोटी खेळताना टी ट्वेंटी डोक्यातून काढणं जरुरी आहे.

तू 2006 ते 2008 दरम्यान निवड समितीचा अध्यक्ष होतास. दौऱयावर फक्त तीन सामने खेळणार असं सांगणाऱ्या बुमराला निवडलं असतं का?

नाही. इंग्लंड दौऱ्यावर पूर्णपणे फिट असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे दौऱयापूर्वीची आय.पी.एल. खेळणं योग्य नाही असं मी त्याला सांगितलं, पटवलं असतं. मुंबई इंडियन्सचे मुकेशभाई फार समजदार आहेत. बुमराला करारामधून मुक्त करा किंवा कमी खेळवा अशी विनंतीही मी त्यांना केली असती. माझी खात्री आहे, त्यांनी विनंती मान्य केली असती.

मला आणखी एक म्हणायचं आहे, बुमराला कुणी दोष मात्र देऊ नये. कसोटी क्रिकेटपर्यंतचा खडतर प्रवास प्रत्येक खेळाडू देशासाठी खेळण्याचा सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच करत असतो. गेल्याच वर्षी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झालीय. त्याने व्यवस्थित विश्रांती घेऊन पूर्ण फिट होऊन परतावं असं मला वाटतं.

सिराजबद्दल…

व्वा! त्याच्यामुळेच तर मालिकेत बरोबरी केली आपण. लागोपाठ पाच सामने त्याच उत्साहाने, जिगरबाजपणे अन् परिणामकारकपणे त्याने गोलंदाजी केली. याची नक्कीच इतिहासात नोंद होईल.

Comments are closed.