त्याला अजून काय करावं लागेल? यशस्वी जयस्वालला टी-20 वर्ल्ड कप संघात न घेतल्याने माजी निवडकर्त्याचा संताप
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य निवडकर्ते दिलीप वेंगसरकर (Dilip vengaskar) यांनी, अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने यशस्वी जयस्वालला (Yashsvi jaiswal) 2026 च्या टी-20 वर्ल्ड कप संघातून बाहेर ठेवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 2024 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघात जयस्वालचा समावेश होता, मात्र त्यानंतर त्याला सातत्याने डावलले जात आहे.
जयस्वालने जुलै 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता. सलामीवीर म्हणून त्याची मागील 5 डावांतील कामगिरी (93, 12, 40, 30 आणि 10 धावा) चांगली असूनही त्याला संधी देण्यात आलेली नाही.
वेंगसरकर म्हणाले की, जयस्वालची कोणतीही चूक नसताना त्याला वारंवार बाहेर बसवणे हे दुर्दैवी आहे. जयस्वाल सध्या सर्व फॉरमॅटमध्ये उत्तम फॉर्ममध्ये आहे. संघात जागा मिळवण्यासाठी त्याने अजून काय करावे, हेच समजत नाही. कोणत्याही ‘मॅच विनर’ खेळाडूला संघातून बाहेर काढू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वेंगसरकर यांना विचारण्यात आले की तुम्ही निवडकर्ता असता तर जयस्वालला काय म्हणाला असता? त्यावर ते म्हणाले, मी त्याला काहीच बोललो नसतो, कारण मी त्याला संघातून बाहेरच काढले नसते.
या वर्षी भारताचा उपकर्णधार बनवण्यात आलेल्या शुबमन गिललाही संघातून डच्चू देण्यात आला आहे. दुसरीकडे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यामुळे ईशान किशनचे प्रदीर्घ काळानंतर संघात पुनरागमन झाले आहे. यशस्वी जयस्वालला नुकताच पोटाच्या त्रासामुळे (Gastroenteritis) पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तो पूर्णपणे बरा झाला असून न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे. 29 डिसेंबर 2025 रोजी जयपूरमध्ये छत्तीसगडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो मैदानात उतरेल.
Comments are closed.