Dipa Karmakar : ऑलिंपिक गाठणारी पहिली महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकर
लहानपणापासूनच दीपा कर्माकरला दुखापती अधिक! तिचे पाय सपाट असल्याने ती कधी जिम्नॅस्ट खेळाडू होऊच शकणार नाही असा निष्कर्ष तज्ज्ञ मंडळींनी काढला होता. परंतु जिम्नॅस्टमध्ये तिने चमकावे असे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. आणि अडथळ्यांवर मात करत ती ऑलिंपिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला बनली. पाहूयात दीपाचा धाडसी खेलप्रवास.
दीपा कर्माकर हिचा जन्म 9 ऑगस्ट 1993 रोजी आगरतळा, त्रिपुरामध्ये झाला. तिने वयाच्या 6 व्या वर्षी जिम्नॅस्टिक्सला सुरुवात केली. तिचे प्रशिक्षक होते विश्वेश्वर नंदी. जिम्नॅस्टिक क्लासमध्ये नोंदणीच्या वेळी दीपाचे पाय सपाट होते. अशा पायांमुळे अॅथलेटला संतुलन राखणे, धावणे किंवा उडी मारणे यात अडचणी येतात. त्यामुळे हे दुरूस्त करणे दीपा आणि तिच्या प्रशिक्षकांसाठी मोठे आव्हान होते. परंतु जिम्नॅस्टिकपटू व्हायचेच अशी मनाशी खूणगाठ बांधलेल्या दीपाने कठोर परिश्रमाने हे आव्हान पेलले. वडील दुलाल यांच्याकडे वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेता घेता ती जिम्नॅस्टिकपटू कधी झाली हे तिच्या वडिलांनाही कळले नाही.
सपाट पायांचे हे आव्हान पेलत असताना तिने जिम्नॅस्टिकसाठीही अत्यंत कठीण प्रकार निवडला होता तो म्हणजे ‘प्रोदुनोव्हा व्हॉल्ट’. समोरच्या बाजूने उडी मारून दोन वेळा हवेत कोलांटी उडी घेऊन जमिनीवर परतताना दोन्ही गुडघे छातीजवळ घेऊन उतरायचे असा हा अवघड प्रकार होता. रशियन जिम्नॅस्ट येलेना प्रोदुनोव्हाच्या नावाने हा प्रकार ओळखला जातो. त्याच्या अवघडपणामुळेच त्याला ‘मृत्यूची तिजोरी’ असेही म्हटले जाते. भलेभले खेळाडूही हा प्रकार करायला घाबरतात. 2015 मध्ये ग्लासगो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने हा प्रकार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिला हा प्रकार करताना पाहून तिचे प्रशिक्षक खूप घाबरले होते. यामध्ये दीपा जीव गमावेल किंवा मान तरी मोडून घेईल, अशी भीती त्यांना वाटत होती. परंतु काही नवे करण्याच्या जिद्दीने पछाडलेली दीपा मागे हटली नाही. आणि तिने हा प्रकार यशस्वी करून दाखवला.
2014 मध्ये तिने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. असे करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्याच वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत ती चौथ्या स्थानावर राहिली. त्यानंतर आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. या विजयानंतर, 2016 मधील रिओ ऑलिंपिकमध्ये महिलांच्या व्हॉल्टिंगच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली. 2018 मध्ये तुर्कीतील मेर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये व्हॉल्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होती.
तिला 2016 साली राजीव गांधी खेल रत्न (आताचा मेजर ध्यानचंद खेल रत्न) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर 2017 साली तिला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा : Summer Fashion : समर सीझन इव्हेंटसाठी फ्रॉक कुर्ती डिझाइन्स
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.