पाकिस्तानात 'हिंदू' क्रिकेटपटूशी भेदभाव, आता अमेरिका कारवाई करणार का?
पाकिस्तान क्रिकेट संघातील अस्थिरता आणि व्यवस्थापनातील गोंधळ दिवसेंदिवस वाढत आहे. कर्णधार आणि प्रशिक्षक सातत्याने बदलले जात असल्याने संघाच्या कामगिरीवर गंभीर परिणाम होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील निराशाजनक कामगिरीमुळे चाहत्यांमध्ये रोष आहे, आणि याच पार्श्वभूमीवर माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवरील अन्याय आणि भेदभावाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कनेरियाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये त्याच्यासोबत झालेल्या भेदभावाचा खुलासा केला.
“मी हिंदू असल्यामुळे मला पाकिस्तान क्रिकेटमध्ये समान संधी मिळाली नाही. माझ्या संघातील अनेक सहकाऱ्यांनी माझ्याशी वेगळ्या नजरेने पाहिले. मला नेहमी बाजूला ठेवण्यात आले आणि माझ्या टॅलेंटला योग्य प्रकारे वाव देण्यात आला नाही. जर मी दुसऱ्या देशासाठी खेळत असतो, तर माझे करिअर खूप मोठे झाले असते,” असे भावनिक वक्तव्य त्याने केले.
कनेरियाच्या या आरोपाने पाकिस्तान क्रिकेटमधील धार्मिक भेदभावाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधीही काही माजी खेळाडूंनी यावर अप्रत्यक्षरित्या भाष्य केले आहे, पण कनेरियाने थेटपणे हा मुद्दा उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे.
“माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यासोबत अन्नही खाण्यास टाळाटाळ केली. मला वेगळ्या नजरेने पाहिले गेले, आणि त्यामुळे माझ्या कारकिर्दीवर परिणाम झाला. पाकिस्तान क्रिकेटमध्ये योग्य वागणूक मिळाली असती, तर मी आणखी काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो असतो,” असे तो म्हणाला.
दानिश कनेरियाने केवळ 29व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला, हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. सध्याच्या काळात क्रिकेटपटू 30-35 वर्षांपर्यंत उच्च दर्जाचे क्रिकेट खेळतात, पण कनेरिया याला अपवाद ठरला.
केवळ भेदभावाचा आरोप करून कनेरिया थांबला नाही, तर त्याने थेट अमेरिकेकडे मदतीची मागणी केली. तो म्हणाला, “अमेरिका हा मानवाधिकारांचा पुरस्कर्ता आहे. मी अमेरिकेच्या सरकारला विनंती करतो की त्यांनी या प्रकारच्या भेदभावांविरोधात कठोर कारवाई करावी. माझ्यासारख्या खेळाडूंना योग्य संधी उपलब्ध व्हाव्यात.”
दिनेशने आपल्या कसोटी कारकिर्दीत 61 सामन्यांमध्ये 261 विकेट्स घेतल्या, तर 18 एकदिवसीय सामन्यांत त्याच्या नावावर 15 बळी आहेत. एक उत्कृष्ट लेग-स्पिनर असूनही, त्याला अपेक्षित संधी मिळाली नाही, हेच त्याच्या निवृत्तीमागील प्रमुख कारण असल्याचे तो सांगतो.
Comments are closed.