ओव्हल टेस्टपूर्वी संघ निवडीच्या रणनीतीवर जोरदार चर्चा, 4 वर्षांपासून पदार्पणाची वाट पाहणाऱ्या ‘या’ खेळाडूला संधी मिळणार का?
टीम इंडियाचा (IND vs ENG) इंग्लंड दौरा आता अंतिम टप्प्यावर आला आहे. लीड्स, बर्मिंघम आणि मँचेस्टरनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा लंडनमध्ये पोहोचला आहे, जिथे 31 जुलैपासून केनिंग्टन ओव्हल मैदानावर पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा टीम सिलेक्शनवरून चर्चा रंगली आहे. या चर्चेचं कारण आहे, अनुभवी देशांतर्गत फलंदाज अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) जो गेली चार वर्षे संघासोबत प्रत्येक दौऱ्यावर असतो, पण अजूनही त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
अभिमन्यूला प्रत्येक सामन्याच्या आधी टीमच्या प्रॅक्टिस सेशन्समध्ये पाहिलं गेलं आहे. मग ती फिल्डिंग असो किंवा नेट सेशन्स, तो नेहमीच उत्साहात दिसतो. पण जेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याचा विषय येतो, तेव्हा संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास ठेवण्यात कचरतं. मँचेस्टरमध्ये जेव्हा करुण नायरला (Karun Nair) बाहेर बसवण्यात आलं, तेव्हा वाटलं की आता अभिमन्यूला संधी मिळेल. पण त्या ठिकाणी साई सुदर्शनला (Sai surdarshan) प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आलं.
अभिमन्यू ईश्वरन 2021-22 पासून भारतीय कसोटी संघाचा भाग आहे. तो सातत्याने दौऱ्यांवर जात आहे, पण निवडकर्त्यांनी आजपर्यंत त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिलेली नाही. त्याच्यापेक्षा नंतर आलेले 15 खेळाडू आपली कसोटी कारकीर्द सुरू करून गेले आहेत. यात सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि रजत पाटीदार यांसारखी नावं आहेत. म्हणजेच, अभिमन्यू फक्त “टूरिस्ट” म्हणून संघाबरोबर फिरत आहे.
संघ व्यवस्थापनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उभं राहतं कारण त्यांनी अनेकदा IPL मधील प्रदर्शनालाच जास्त महत्त्व दिलं आहे. साई सुदर्शनने खरं तर (IPL 2025) मध्ये चांगली खेळी केली, पण घरेलू क्रिकेटमधले आकडे अभिमन्यूच्या बाजूने आहेत.
अभिमनु इश्वरनचंद प्रथम श्रेणीतील विक्रम
समोर: 103
धावा: 7841
सरासरी: 54.25
शतके: 27
अर्धशतके: 31
साई सुदर्शनचं फर्स्ट क्लास रेकॉर्ड:
समोर: 30
धावा: 1987
सरासरी: 36
शतके: 7
अर्धशतके: 5
यातून स्पष्ट होतं की अनुभव आणि स्थिरतेच्या बाबतीत अभिमन्यू खूप पुढे आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनीही अनेकदा घरेलू क्रिकेटच्या आधारे निवड व्हावी, असं मत मांडलं आहे. पण प्रत्यक्षात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये ही गोष्ट दिसून येत नाही. त्यामुळेच माजी निवडकर्ते सबा करीम यांनी टीम सिलेक्शनवर उघडपणे टीका केली आहे. ते म्हणाले, फक्त IPL मधल्या कामगिरीवर खेळाडूला निवडणं चूक आहे. जे खेळाडू अनेक वर्षांपासून डोमेस्टिकमध्ये चांगलं खेळत आहेत, त्यांना दुर्लक्ष करणं ही निवड प्रक्रियेवरचं मोठं प्रश्नचिन्ह आहे.
31 जुलैपासून सुरू होणाऱ्या ओव्हल कसोटी सामन्यात जर संघ व्यवस्थापन संतुलित संघ तयार करत असेल, तर अभिमन्यू ईश्वरनसाठी संधीचं एक मोठं दार उघडू शकतं. भारत आधीच मालिकेत पिछाडीवर आहे आणि अंतिम सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर अनुभवी खेळाडूंची गरज असेल. अशा परिस्थितीत या वेळी अभिमन्यूला संधी मिळते का, हे पाहणं रंजक ठरेल.
Comments are closed.