पायलटच्या चुकांची चर्चा खेदजनक
अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मतप्रदर्शन: स्वतंत्र चौकशीची शक्यता शोधण्याचे न्यायालयाचे निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अहमदाबाद विमान दुर्घटनेत वैमानिकाच्या चुकीबद्दलच्या अटकळांना सर्वोच्च न्यायालयाने खेदजनक म्हटले आहे. सोमवारी न्यायालयाने केंद्र सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) यांच्याकडून यासंबंधी उत्तर मागितले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता देखील विचारात घेण्याचे मत नोंदवले. विमान सुरक्षा स्वयंसेवी संस्था सेफ्टी मॅटर्स फाउंडेशनने या संदर्भात जनहित याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या आहेत.
प्राथमिक अहवालात महत्त्वाची माहिती लपवल्याचा आणि नागरिकांच्या जीवन, समानता आणि अचूक माहिती मिळविण्याच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. इंधन स्विचमध्ये बिघाड आणि विद्युत बिघाड यासारख्या तांत्रिक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असताना अपघातासाठी केवळ पायलटलाच जबाबदार धरण्यात आले, असे जनहित याचिकेत म्हटले आहे.
12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 विमान टेकऑफनंतर लगेचच मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळल्यामुळे 270 लोकांचा मृत्यू झाला होता. सुमित सभरवाल हे विमानाचे मुख्य वैमानिक होते. तर क्लाईव्ह कुंदर हे सहवैमानिक होते.
एनजीओचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी काही महत्त्वाच्या नोंदी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. अपघाताला 100 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत, परंतु केवळ प्राथमिक अहवालच प्रसिद्ध झाला आहे.अहवालात प्रत्यक्षात काय घडले आणि भविष्यात कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे स्पष्ट केलेले नाही. याचा अर्थ आजही या बोईंग विमानांवर प्रवास करणारा प्रत्येकजण धोक्यात आहे. निष्पक्ष चौकशीची मागणी योग्य आहे, परंतु सर्व निष्कर्ष सार्वजनिक केल्याने तपासात अडथळा येऊ शकतो, असेही सांगण्यात आले.
Comments are closed.