डीजीएमओ बैठकीत युद्धबंदीबद्दल चर्चा
सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण शांतता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्या सैनिक कार्यवाही महासंचालकांनी (डीजीएमओ) सध्याच्या शस्त्रसंधीसंबंधी चर्चा केली आहे. ही चर्चा पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार सोमवारी दुपारी 12 वाजता होणार होती. तथापि, काही कारणामुळे ती संध्याकाळी 5 वाजता करण्यात आली. दोन्ही अधिकारी एकमेकांशी हॉटलाईनवरुन बोलल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शस्त्रसंधीच्या स्थितीवर ही चर्चा करण्यात आली.
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर शांतता आहे. तथापि, तणाव मोठा आहे. केव्हाही शस्त्रसंधीचा भंग पाकिस्तानकडून केला जाऊ शकतो, अशी स्थिती आहे. तसे झाल्यास भारत आधीपेक्षाही मोठा दणका पाकिस्तानला देईल असे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सशस्त्र संघर्षाला केव्हाही पुन्हा तोंड फुटू शकते, अशी स्थिती असल्याचे काही तज्ञांचे मत आहे.
सविस्तर माहिती नाही
या चर्चेची सविस्तर माहिती प्रसारित करण्यात आलेली नाही. साधारणत: 40 मिनिटे ही चर्चा चालली, असे स्पष्ट करण्यात आले. ही शस्त्रसंधी भारताच्या अटींवर करण्यात आल्यामुळे भारत आपल्या अटींवर ठाम आहे, असे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानवर जे निर्बंध घातले आहेत, ते शस्त्रसंधी झाल्यानंतरही लागू राहणार आहेत. या निर्बंधांमध्ये सिंधू पाणीवाटप कराराला भारताने दिलेल्या स्थगितीचाही समावेश आहे. ही स्थगिती मागे घेण्यास भारताने स्पष्टपणे नकार दिला आहे.
सध्या स्थिती काय आहे…
सध्या जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शांतता असल्याचे दिसून येते. तथापि, अद्याप लोकांना त्यांच्या घरी परतण्याचा आदेश देण्यात आलेला नाही. सीमेवर भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज अवस्थेत आहे. पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचा भंग झाल्यास पाकिस्तानला प्रचंड तडाखा देण्यासाठी भारताची सेना समर्थ आहे. गुजरात, राजस्थान आणि पंजाबच्या सीमारेषांवरचे ड्रोन हल्ले पाकिस्तानकडून थांबविण्यात आले आहेत. मात्र, ही शांतता अस्थिर असून आणखी काही दिवस गेल्याशिवाय तिला स्थिरता प्राप्त होणार नाही, असे अनुमान आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यावर एवढा तीव्र प्रतिहल्ला भारत करेल, अशी पाकिस्तानची अपेक्षा नव्हती. मात्र, भारताने अत्यंत तिखट मारा केला. परिणामी, पाकिस्तानला शस्त्रसंधीसाठी वाकावे लागले आहे. पण पाकिस्तान सैन्याची प्रवृत्ती पाहता त्याला सध्याची शांतता फार काळ ठेवायची नसल्याचे आतापर्यंतच्या अनुभवाने स्पष्ट होते. त्यामुळे सध्याच्या स्थितीत भारताच्या सैन्याला युद्धसज्ज राहण्याचा आदेश दिला गेला आहे.
विशेष सत्राची मागणी
ऑपरेशन सिंदूर या विषयावर केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करावे, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे. या संबंधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले होते. भारताने शस्त्रसंधी करताना अमेरिकेची मध्यस्वी स्वीकारली असा काँग्रेसचा आरोप आहे. तथापि, केंद्र सरकारने या आरोपाचा स्पष्टपणे इन्कार केला असून काश्मीरप्रश्नी कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारताने अमेरिकेलाही भारताच्या या भूमिकेची पूर्ण कल्पना दिली आहे.
भाजपचा काँग्रेसवर प्रत्यारोप
पहलगाम हल्ल्याचा भारताने सूड घेतला आहे. तथापि, 2008 मध्ये मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर त्यावेळच्या काँग्रेसप्रणित सरकारने कारवाई केली नाही. त्यामुळे काँग्रेसला भारतीय जनता पक्षप्रणित केंद्र सरकारला जाब विचारण्याचा अधिकारच नाही, अशी टीका या पक्षाने केली आहे.
Comments are closed.