डिस्नेच्या कर्मचाऱ्यांवर नोकरकपातीची टांगती तलवार, मार्केटिंग विभागावर गंडांतर
अमेरिकेतील बहुराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिस्ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी येत्या काही आठवड्यांत सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता असून, नव्याने मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या जोश डि’अमारो यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच मोठी नोकरकपात ठरणार आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, ही कपातीची योजना डि’अमारो यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच आखण्यात आली होती. या प्रक्रियेत प्रामुख्याने मार्केटिंग विभागातील पदांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कंपनी आपल्या विविध विभागांतील कामकाज अधिक सुलभ आणि खर्चिक बाबी कमी करण्याच्या उद्देशाने ही पावले उचलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डिस्नेने यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. 2022 पासून माजी मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब आयगर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने 8 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. या निर्णयामुळे कंपनीला सुमारे 7.5 अब्ज डॉलरची बचत करण्यात यश आले होते. सध्याची कपात ही त्याच पुनर्रचना प्रक्रियेचा पुढील टप्पा मानली जात आहे.
कंपनीचे मुख्य मार्केटिंग अधिकारी असद अयाझ यांनी ‘इमॅजिन’ या प्रकल्पाअंतर्गत चित्रपट, दूरदर्शन आणि स्ट्रीमिंग या तिन्ही विभागांतील मार्केटिंग टीम्स एकत्र आणण्याची योजना सुरू केली आहे. या एकत्रीकरणामुळे कामातील पुनरावृत्ती कमी होईल, निर्णयप्रक्रिया जलद होईल आणि संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर करता येईल, असा कंपनीचा विश्वास आहे.
दरम्यान, स्ट्रीमिंग व्यवसायातून अपेक्षित प्रमाणात नफा मिळत नसल्यामुळे डिस्नेवर आर्थिक दबाव वाढला आहे. पारंपरिक टीव्हीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत स्ट्रीमिंगमधील नफा कमी असल्याने कंपनीला आपले खर्च नियंत्रणात ठेवणे आवश्यक झाले आहे. याशिवाय, Amazon Prime Video आणि Netflix यांसारख्या प्लॅटफॉर्म्समधील तीव्र स्पर्धेमुळेही डिस्नेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
2225 आर्थिक वर्षाच्या अखेरीस डिस्ने कंपनीत सुमारे 2,31,222 कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे प्रस्तावित कपातीचा परिणाम एकूण कर्मचाऱ्यांच्या एक टक्क्यांपेक्षा कमी राहणार असला, तरी त्याचा परिणाम कंपनीच्या विविध विभागांवर जाणवणार आहे.
याच दरम्यान, डिस्नेचा OpenAI सोबतचा सुमारे 1 अब्ज डॉलरचा महत्त्वाचा करार रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. या करारानुसार ‘सोरा’ या एआय मॉडेलद्वारे तयार होणाऱ्या व्हिडिओंमध्ये आयर्न मॅन आणि डार्थ व्हेडरसारख्या लोकप्रिय पात्रांचा वापर करण्याची योजना होती. मात्र, हा करार पुढे न गेल्याने कंपनीला आणखी एक आर्थिक धक्का बसल्याचे मानले जात आहे.
डिस्नेच नव्हे, तर हॉलिवूडमधील इतर मोठ्या कंपन्याही कर्मचारी कपातीच्या मार्गावर आहेत. Sony Pictures, Paramount आणि Warner Bros. Discovery यांनीही अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे. विशेषतः सोनी पिक्चर्स आपल्या दीर्घकालीन वाढीच्या धोरणाचा भाग म्हणून शेकडो कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
Comments are closed.