Dispute between Nilesh Rane and Nitesh Rane brothers escalates, post war begins on social media
राज्यातील राजकीय वातावरण सध्या इतके गढूळ झाले आहे, की कोणाच्या विरोधात जाईल हे सांगता येत नाही. अशातच आता राजकारणात आणखी एका नव्या वादाला सुरुवात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा वाद आहे राणे बंधू यांच्यामधील.
मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या इतके गढूळ झाले आहे, की कोणाच्या विरोधात जाईल हे सांगता येत नाही. अशातच आता राजकारणात आणखी एका नव्या वादाला सुरुवात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा वाद आहे राणे बंधू यांच्यामधील. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी लहान भावाला म्हणजेच भाजपा आमदार, तसेच राज्यातील मंत्री नितेश राणेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ला दिला होता. ज्यानंतर या दोन्ही भावांमध्ये वादाची ठिणगी पडली. पण हा वाद तेवढ्यापुरता होता, असे वाटत असतानाच आता राणे बंधुंमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण आता नितेश राणेंकडून त्यांच्या पक्षातील एका पदाधिकाऱ्याला निलेश राणेंनी जो धमकीचा मेसेज केला होता, त्याचा स्क्रीनशॉट शेअप केला आहे. ज्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. (Dispute between Nilesh Rane and Nitesh Rane brothers escalates, post war begins on social media)
मंत्री नितेश राणे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी व्हॉट्सअप चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये निलेश राणे यांनी “नको ती स्टेटमेंट देऊ नका, अंगाशी येईल तुमच्या. नंतर वाचवायला कोण येणार नाही.” असा मेसेज केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, “अजून मी संयम ठेवून आहे.” असा मेसेजही निलेश राणेंनी समोरील व्यक्तीला केला आहे. त्यामुळे हाच स्क्रीनशॉट मंत्री नितेश राणेंनी शेअर केला आहे. तर हा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले आहे मंत्री राणेंनी म्हटले आहे की, “आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवस अगोदर महायुतीबद्दल बोलला होता. आता असे आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो.” असे नितेश राणेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे लहान भाऊ आपल्या पदाधिकाऱ्यासाठी मोठ्या भावाच्या विरोधात उभा राहिल्याचे पाहायला मिळत आहे.
आदरणीय निलेशजी ,
आपणच काही दिवसा अगोधर महायुती बदल बोलला होता..
आता असे आपल्याच मित्र पक्षाचा पदाधिकारी ला धमकवणे बरोबर नाही..
शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत..
आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो @meNeeleshNRane pic.twitter.com/iMcMSTQVh3— Nitesh Rane (@NiteshNRane) June 18, 2025
मंत्री नितेश राणे यांनी हा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर राणे भावांमधील वाद मिटतो की वाढतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, याच महिन्यात आमदार निलेश राणे यांनी लहान भावाला, मंत्री नितेश राणेंना सल्ला देत म्हटले होते की, “नितेश राणेंनी जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेनच. पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे. सभेत बोलणे सोपे आहे. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमके कोणाचा फायदा करतोय याचे भान असले पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.” निलेश राणे यांनी ही पोस्ट केल्यानंतर नितेश राणे यांनी त्या पोस्टवर मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. निलेशजी तुम्ही tax free आहात, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर काही वेळाने निलेश राणे यांच्याकडून पोस्ट डिलिट करण्यात आली होती.
Comments are closed.