‘तर सरनाईक माझे ड्रायव्हर….’, काशीगाव मेट्रो परिसरातील 30 टक्के जमीनीवर वाद पेटला, सरनाईकांच

मिरा-भाईंदर :  मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रातील राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे पुत्र पुर्वेश प्रताप सरनाईक (Purvesh Sarnaik) यांनी आमदार नरेंद्र मेहता ( Narendra Mehta) यांना उद्देशून एक पत्र लिहत त्यांनी एका युट्युब चॅनल वर केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. या पत्रात पूर्वेश सरनाईक यांनी मेहता यांच्या “प्रताप सरनाईक मेरे ड्रायव्हर असते” या वक्तव्याचा उल्लेख करत, ते अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीचे असल्याचे म्हटले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र त्यामध्ये सभ्यता आणि मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जनतेने दिलेल्या कौलनंतर लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असताना, वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. तसेच चार वेळा निवडून आलेले आमदार आणि सध्याचे मंत्री असलेल्या व्यक्तीबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे ही राजकीय संस्कृतीला शोभणारी नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. पूर्वेश सरनाईक यांनी आपल्या पत्रातून “राजकारण हे केवळ स्टेटमेंट देण्यासाठी नसून ते संस्कारांची गोष्ट आहे” असे नमूद करत, वैचारिक मतभेद असले तरी व्यक्तीचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.

या पत्रामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, येत्या काळात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या वक्तव्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ही संताप व्यक्त होत असून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यावर शिवसेना विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर यांनी प्रत्युत्तर देताना, “आमचा नेता संयमी आहे, त्यामुळे आम्हीही संयम पाळतो,” असा खोचक टोला लगावला. तसेच, “उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे, मात्र सध्या संयम राखत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

pratap sarnaik VS narendra mehta:  नरेंद्र मेहता नेमकं काय म्हणालेले?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं की मिरा-भाईंदरमधील ३०% जमीन मेहता यांच्या आहेत, या वादावरून सुरू असलेले राजकारण आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर पोहोचले आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. नरेंद्र मेहता यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, प्रताप सरनाईकांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेऊ नका, जर माझ्याकडे ३० टक्के जमीन असता तर प्रताप सरनाईकांना ५०० फुटावरून मला बोलावं लागलं असतं, ते माझ्या जवळ येऊ शकले नसते. जर माझी 30 टक्के जमीन असती तर प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते,” असे विधान मेहता यांनी केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

pratap sarnaik VS narendra mehta:  पुर्वेश सरनाईकांनी पत्रात काय म्हटलंय?

सर्वप्रथम, मीरा भाईंदर महानगरपालिकेतील आपल्या भव्य विजयाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. जनतेने दिलेला हा कौल आम्ही पूर्णपणे मान्य करतो आणि त्याचा आदरही करतो. लोकशाहीत जनतेचा निर्णय अंतिम असतो—हे जागरूकतेने तेव्हाच प्रामाणिकपणे पटते.

मात्र, या विजयानंतर आपण आता शहराच्या विकासावर, जनतेच्या प्रश्नांवर आणि ठोस कामांवर लक्ष केंद्रित कराल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु, दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत आपल्या वक्तव्यांमध्ये केवळ मा. श्री. प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करण्याचाच सूर दिसून येत आहे—जे स्वतः चार वेळा जनतेने निवडून दिलेले आमदार आणि आज राज्याचे मंत्री आहेत.

आपले अलीकडील वक्तव्य—

“प्रताप सरनाईक मेरे ड्रायव्हर होते”

हे ऐकून खरोखर आश्चर्य वाटले नाही… कारण ते आपल्या राजकीय संस्कारांचे प्रतिबिंब होते. मात्र, त्यातून
आपल्या व्यक्तिमत्त्वातील खालच्या पातळीचा अंदाज नक्कीच आला.

मेहता जी, राजकारणात मतभेद असू शकतात, विचार वेगळे असू शकतात—पण त्यात एक सभ्यता आणि
मर्यादा असते. ती राखणे ही प्रत्येक जनप्रतिनिधीची जबाबदारी असते.

राजकारणात मोठेपणा शब्दांनी नव्हे, तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो.

माझ्या आई-वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली आहे—

विचार जुळले नसले तरी व्यक्तीचा आदर ठेवावा.

आणि तेच मी आजपर्यंत पाळत आलो आहे.

तसेच, त्यांनी ही शिकवण दिली आहे की, खाली पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका कधीच करू नये—जरी राजकीय मुद्दे आणि संधी दोन्ही असतील
तरी.

खरं सांगायचं तर, आमच्याकडेही अनेक संधी होत्या—

“इनसाईड द टॉयलेट” सारख्या प्रसंगांवर बोलण्याच्या…

पण आम्ही आणि आमचा पक्ष त्या पातळीवर कधीच गेलो नाही—कारण आमच्यासाठी राजकारण ही
संस्कारांची गोष्ट आहे, केवळ स्टेटमेंटबाजी नाही.

आपणही हाच आदर्श ठेवावा, ही नम्र अपेक्षा.

मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की आपण मीरा भाईंदरच्या विकासासाठी काम कराल—ज्या
शहरासाठी माझे वडील अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत आले आहेत.

एक मुलगा म्हणून, मी आजही आपल्या अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो…

पण कृपया मला तीच संधी पुन्हा पुन्हा देऊ नका.

कारण संयम हा आमचा स्वभाव आहे—

कमजोरी नाही.

धन्यवाद,

पूर्वेश प्रताप सरनाईक

आणखी वाचा  – Devendra Fadnavis and Pratap Sarnaik: मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, ‘सगळं रेकॉर्ड होतंय बरं का’

Mumbai Metro : मुंबईतील नव्या मेट्रोचं उद्घाटन झालं पण जिन्याचं काम अर्धवट राहिलं, जागेची मालकी भाजप आमदाराकडे, प्रताप सरनाईक अधिकाऱ्यांना म्हणाले…

Comments are closed.