अहिल्यानगर दक्षिण भाजप कार्यकारिणी बरखास्त करा, शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर निष्ठावंतांनी केली मागणी

भाजपमध्ये अंतर्गत वाद काही थांबायला तयार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता नवा-जुना असा संघर्ष सुरू झाला आहे. नुकतीच जाहीर केलेली भाजपाची नगर दक्षिण विभागाची पदाधिकाऱ्यांची निवड तत्काळ बरखास्त करावी, असे 100 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर जिल्ह्यातील भाजपाच्या निष्ठावान तीन पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

प्रा. सुनील मोहनराव पाखरे,  नागनाथ भारतराव गर्जे (राजे) आणि युसूफ उस्मानगणी शेख यांनी ही मागणी केली असून, याची प्रत थेट भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पाठविण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये भाजप अंतर्गत संघर्ष सुरू आहे. त्यात नवा जुना-वाद टोकाला गेला आहे. याअगोदरही विखे विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर दक्षिण भाजप जिल्हा कार्यकारिणीवर गंभीर आरोप करत जुने, निष्ठावान व पक्षविचारधारा जपणारे कार्यकर्ते थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यकारिणी बरखास्तीची मागणी घेऊन धडकले आहेत. पक्ष स्थापनाकाळापासून पक्षासाठी 30-40 वर्षे घालवणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीतून बाजूला करून अन्य पक्षांतून पतन पावलेले, राजकीय मृत्यू पत्करलेले आणि पक्षविचारधारेशी कोणताही संबंध नसलेले अतिक्रमणी लोक कार्यकारिणीत घुसवले गेल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, सध्याची कार्यकारिणी ही पक्षनिष्ठ, लढाऊ कार्यकर्त्यांची फळी नसून, जातिवाद, विषारी मानसिकता आणि गलिच्छ राजकारण करणाऱ्या एका लोकप्रतिनिधीच्या लाचार टोळीची आहे. अशा बनावट (फर्जी) कार्यकारिणीमुळे पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात आली असून, संघटनात्मक प्रमुख म्हणून प्रदेशाध्यक्षांनी तत्काळ हस्तक्षेप करून शुद्धीकरणाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, या विषयाला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात जलदगतीने आव्हान देण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Comments are closed.