आखातातील युद्धाच्या झळा किचनपासून स्मशानापर्यंत! व्यावसायिक सिलिंडरचे वितरण थांबवले; स्मशानभूमीतील 27 दाहिन्या बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका, इस्त्रायल, इराण यांच्यातील युद्धाच्या झळा किचनपासून स्मशानापर्यंत बसू लागल्या आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात व्यावसायिक सिलिंडरचे वितरण थांबविण्यात आले असून, हॉटेल आणि खानावळचालकांपुढे चिंता उभी ठाकली आहे. घरगुती सिलिंडरही ६० रुपयांनी महागला आहे, तर शहरातील विविध स्मशानभूमीत असलेल्या २७ दाहिन्या बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. यामध्ये वैकुंठातील तीन दाहिन्यांचा समावेश आहे.

पुणे महापालिकेच्या अखत्यारितील विविध स्मशानभूमींमध्ये गॅसवर चालणाऱ्या दाहिन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, सध्या व्यावसायिक पद्धतीने मिळणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे या दाहिन्या बंद ठेवाव्या लागत आहेत. वैकुंठ स्मशानभूमीतील तीन गॅस दाहिन्या सध्या बंद असून, शहरातील इतर स्मशानभूमींमधील २४ दाहिन्यांसह एकूण २७ गॅस दाहिन्या कार्यरत नाहीत. या दाहिन्या सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिक दराने गॅस खरेदी करावा लागतो. मात्र, शासनाच्या आदेशानंतर सध्या व्यावसायिक गॅस पुरवठा होत नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.

शहरातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक सुविधा असलेली वैकुंठ स्मशानभूमी येथे दररोज मोठ्या संख्येने अंत्यसंस्कार केले जातात. पर्यावरणपूरक आणि जलद अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिन्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे या सुविधा तात्पुरत्या बंद ठेवाव्या लागल्या असून, त्यामुळे येथे विजेवर चालणाऱ्या पाच दाहिन्यांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे.

गॅस दाहिन्या बंद असल्यामुळे काही ठिकाणी पारंपरिक लाकडी चितांवर अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय वापरला जात आहे. त्यामुळे काही स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचीही माहिती समोर आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, गॅस पुरवठा सुरळीत होताच गॅस दाहिन्या तातडीने सुरू करण्यात येतील. तसेच गॅस उपलब्धतेबाबत संबंधित पुरवठादार कंपन्यांशी सातत्याने संपर्क ठेवून परिस्थिती लवकर सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.