आमच्यावर कारवाई केलीत, बिल्डरवरही गुन्हे दाखल करा; दिव्यातील शेकडो बेघर रहिवाशांचा पालिकेला घेराव, प्रवेशद्वारावरच ठिय्या देत केले आंदोलन

न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा इमारतीविरोधात मोहीम हाती घेत सात इमारती रिकाम्या केल्या. या कारवाईत बेघर झालेल्या शेकडो रहिवाशांनी आज आपल्या मुलाबाळांसह पालिका मुख्यालयावर धडक देत आंदोलन केले. आमच्यावर कारवाई केलीत, दोषी बिल्डरांवरही गुन्हे दाखल करा, असा टाहो फोडतानाच आता आम्ही कुठे जायचे, असा सवाल प्रशासनाला केला. पुनर्वसनाबरोबरच बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची मागणीदेखील या वेळी आंदोलकांनी केली.

उच्च न्यायालयाच्या दणक्याने दिवाळीच्या सुट्टीनंतर ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा बेकायदा इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला. सोमवारी दिव्यात कारवाई करायला गेलेल्या पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. कारवाईला विरोध करत असलेल्या एका महिलेने तर पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर चक्क पेट्रोल टाकले. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला. त्यानंतर मंगळवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात ७ इमारती पालिकेने रिकामी केल्या. आता या सर्व इमारती तोडण्याची कारवाई पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

रस्त्यावर राहण्याची वेळ

बेकायदा सात इमारतींमध्ये २७५ कुटुंबे आणि जवळपास १ हजार ६०० रहिवाशी वास्तव्यास होते. दहा ते बारा लाख रुपये मोजून रहिवाशांनी इमारतीमध्ये घरे विकत घेतली. त्यामुळे या इमारतींमधून रहिवाशांना बाहेर काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. मात्र या सर्व इमारती पालिकेने रिकाम्या केल्याने राहते घर सोडून रस्त्यावर राहण्याची वेळ या सर्व रहिवाशांवर आली आहे.

न्यायालयात घेणार धाव

बिल्डरने आमची फसवणूक केली असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करत यापुढे या प्रकरणात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार सर्व रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे लवकरच न्यायालयात जाण्याचा इशारा बेघर झालेल्या रहिवाशांकडून देण्यात आला आहे.

Comments are closed.