लक्ष्मीपूजनाची लगबग पूजासाहित्य खरेदीसाठी झुंबड
दिवाळीच्या आनंदोत्सवातील सर्वांत मंगल दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. मंगळवारी (दि.21) दिवस उजाडताच पुणे शहरासह राज्यभरात लक्ष्मीपूजनाच्या तयारीने घराघरांत आणि दुकानांत उत्साहाचे वातावरण आहे. शुभमुहूर्तावर संपत्तीची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मीचे पूजन करून ऐश्वर्य, समृद्धी आणि शुभलाभाची कामना करण्यात येणार आहे. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत शुभमुहूर्त असल्याने व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक पूजनासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, पूजासाहित्य खरेदीसाठी आज दिवसभर बाजारात मोठी गर्दी होती.
दाते पंचांगाचे मोहन दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनासाठी सकाळी 11 ते 12, दुपारी 3 ते 4.30, सायंकाळी 6 ते 8.30 आणि रात्री 10.30 ते 12 या वेळेत शुभमुहूर्त आहेत.
दाते म्हणाले, महाराष्ट्रातील दाते, कालनिर्णय, महालक्ष्मी, निर्णयसागर, सोमण, स्वामी समर्थ आदी पंचांगांमध्ये तसेच देशातील शेकडो दिनदर्शिकांमध्ये आजच लक्ष्मीपूजन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पूजन आणि मुहूर्तांबाबत कोणतीही संभ्रमाची गरज नाही.
धर्मशास्त्रानुसार, आज अमावास्येचा दिवस असून, सूर्यास्तानंतरचा प्रदोषकाळ लक्ष्मीपूजनासाठी सर्वाधिक शुभमानला जातो. दाते म्हणाले, ‘धर्मसिंधु’, ‘पुरुषार्थ चिंतामणी’ आणि ‘तिथिनिर्णय’ ग्रंथांतील उल्लेखानुसार आजचा दिवस लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत योग्य आहे. सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास 24 मिनिटांच्या कालावधीत पूजा करावी.
झेंडू-शेवंतीला ग्राहकांची पसंती
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला पुणे मार्केटयार्डात फुलांचा ओघ वाढला असून सोमवारी पहाटेपासूनच बाजारपेठ रंगतदार झाली. फुलांच्या मोठ्या आवकीला तितकाच उठाव मिळाल्याने भाव स्थिर राहिले आहेत. सोमवारी सकाळपासूनच फूलबाजारात किरकोळ विक्रेते, घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम राहिली, असे अखिल फूलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर आणि समन्वयक सागर भोसले यांनी सांगितले.
” मार्केटयार्ड परिसरात बहुतेक व्यापारी सकाळच्या शुभ आणि दुपारच्या लाभ, अमृत मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करणार आहेत. काही व्यापाऱ्यांनी कालच पूजा केली असली तरी बहुतांश मंडळी आजच्या शुभवेळेची प्रतीक्षा करत आहेत. पूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. सर्वत्र उत्साह आणि मंगलमय वातावरण आहे.
-राजेंद्र बाठिया, अध्यक्ष,
दि पूना मर्चेंट्स चेंबर, मार्केटयार्ड.
” व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजारात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवले आहेत. बाजार आणि परिसरात सुमारे तब्बल २०० ते ३०० टन फुलांची आवक झाली होती. फुलांची विक्री सुरळीत पार पडावी यासाठी स्वतंत्र जागाही दिली आहे. आवक वाढूनही शेतकऱ्यांना फुलांना चांगला भाव मिळत आहे.
– डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.
घाऊक बाजारातील दर
Comments are closed.