सण, उत्सवात गुंतून पडू नका, आता मुंबईला धडकण्याची तयारी करा! मनोज जरांगे यांचे आवाहन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी गुरुवारी रात्रई मारताळा येथे मराठी समाजाची बैठक घेत आता आपल्याला मुंबईत धडकायचे आहे, त्याच्या तयारीला लागा. सण, उत्सव येत असतात. मात्र, त्यात गुंतून पडू नका, आता समाजाच्या लढाईसाठी आपल्याला मोठ्या संख्येने मुंबईत जायचे आहे. आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निश्चय केला.
या वेळी मनोज जरांगे म्हणाले की, मराठा बांधवांनो, नवयुवकांनो हा महिना सण व उत्सवाचा महिना आहे. पण सद्य परिस्थितीत आपल्याला सण उत्सवामध्ये गुंतून पडायचं नाही. आरक्षण मिळाल्यानंतर पुढच्या वर्षी सण, उत्सव धडाक्यात साजरे करूया. आता गरजवंत मराठ्यांचा सरसकट ओबीसी वर्गात समावेश करण्यासाठी 29 तारखेच्या अंदोलन लढ्यात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. त्यासाठी सण, उत्सव सोडून लाखोंच्या संख्येने मुंबईकडे कुच करा तर आणि तरच हे गेंड्याच्या कातडीचं फडणवीस सरकार मराठ्यांना आरक्षण देईल. सर्वांनी रात्र वैऱ्याची समजून सजग रहा. मराठे संकटकाळात कधीच झोपा काढत नाहीत. त्यासाठी येणाऱ्या आठवाड्यात रात्रीचा दिवस करून प्रत्येक मराठ्याला जागे करा व मुंबई येथील अंदोलोनामध्ये लाखोंनी सहभागी व्हा, असे आवहान मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते मारतळा येथील मामा मंगलकार्यालयामध्ये उमरा सर्कल मधील मराठा बांधवाच्या बैठकीत बोलत होते.
एका गावाच्या बैठकीला एवढी समाज संख्या उपस्थित असेल तर जिल्ह्याच्या बैठकीला किती असेल, त्याहीपेक्षा 29 तारखेला मुंबईमध्ये मराठा समाज बांधवांचे किती मोठे तुफान येईल, याचा अंदाज करा असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. आता मराठे आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे असेही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, मी ओबीसीसाठी लढणार, मग मराठा, धनगर, बंजारा व इतर समाजासाठी कोण लढणार? असा सवालही त्यांनी फडणवीस यांना केला. मनोज जरांगे आणि लाखो मराठे मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार, असा इशारा त्यांनी महायुती सरकारला दिला. उद्यापासून घराघरात जाऊन मराठ्यांना मुंबईला जाण्यासाठी तयार करा. मुंबईला 15 दिवस रहाण्याच्या तयारी निशी चला, मी माझ्या समाजाच वाटोळ होऊ देणार नाही. गेल्या दोन वर्षात समाजाला मान खाली घालावी लागेल अशी एकही कृती माझ्या समाज बांधवांकडून घडली नाही. यापुढे समाजाला हरू देऊ नका. समाजाच्या एकजूटीच दर्शन दाखवत मराठा आरक्षण प्रश्नी झोपी गेलेल्या सरकारला जागे करूया, असेही ते म्हणाले.
तुमच रक्त विकून मला मोठे व्हायच नाही. आरक्षण लढा उभा केला व गेल्या दोन वर्षामध्ये 58 लाखनोंदी घेऊन 3 करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले. आता राहिलेल्यांसाठी 29 तारखेला मिळवायंचय. सोशल मिडीयावर प्रत्येकांनी चलो मुंबई असे स्टेटस ठेवा. सर्वांना मेसेज करा, घर व गाव न गाव पिंजून काढा.आपल्याला शांततेत मुंबईत जाऊन आरक्षण मिळवायचयं. तुमच्या सुखा दु:खामध्ये आपला समाजच येणार आहे. इतर कोणी नेता येणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य मंडळींना मुंबईला काढा, असेही ते म्हणाले. मराठ्याच्या वाटेला गेलं की बाजार उठलाच समजा, असा इशाराही त्यांनी फडणवीस सरकारला दिला. गरजवंत मराठ्यांनी आपली लढाई आपणच लढायची आहे. कुणाच्या आशेवर बसायचं नाही, असे ते म्हणाले.
मराठ्यांनो आता बेसावध राहू नका. आपण सारे विजय घेऊनच मुंबईहून परतूया. गुलाल उधळूनच मुंबई सोडायची आहे, असेही ते म्हणाले. प्रारंभी मनोज पाटील जरांगे यांनी स्टेजवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. त्यानंतर सकल मराठा समाज उमरा सर्कल च्या वतीने कापसी गुंफा मठ संस्थानाचे मठाधीपती पुज्य देवगीर महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमरा सर्कल मधील सर्व मराठा युवकांनी सहभाग घेतला होता.
Comments are closed.