बांगलादेशला तांदूळ पुरवठा करू नका.

तांदळाच्या निर्यातदारांचीच केंद्र सरकारकडे मागणी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात हिंसाचार होत आहे. तेथील परिस्थिती अत्यंत भीषण आहे. तेथील प्रशासन हिंदूविरोधी भूमीका घेत असून हिंदूंचा छळ करणाऱ्यांना मोकळे रान मिळवून देत आहे. अशा स्थितीत भारताने त्या देशाला तांदळाचा पुरवठा करु नये, अशी मागणी तांदूळ निर्यातदारांनी भारतच्या सरकारकडे केली आहे. बांगलादेशने काही दिवसांपूर्वी भारताकडे 55 हजार टन तांदळाची मागणी केली होती. या मागणीला निर्यातदारांनी विरोध केला आहे.

बांगलादेशची अर्थव्यवस्था ढासळली आहे. भर म्हणून त्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीही कोलमडली आहे. तेथे अल्पसंख्याक समाजांवर, विशेषत: हिंदू समाजावर अत्याचार केले जात आहेत. हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत. तेथील हिंदू समाजाच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व युनूस प्रशासनाचे आहे. तथापि, हे प्रशासन हिंदूंचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरले आहे. अशा स्थितीत भारताने या देशाला धडा शिकविला पाहिजे, असे भारतात अनेकांचे मत आहे.

तांदळाची मागणी

बांगलादेशात सध्या महागाई आणि चलनवाढ वेगाने होत आहे. धान्याची टंचाईही मोठ्या प्रमाणावर आहे. धान्याचे साठे कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे त्या देशाने भारताकडे तांदळाची मागणी केली आहे. पण, भारताने ती पूर्ण करु नये. त्या देशाला त्याची जागा दाखवून देण्याची हीच संधी आहे, असे आता तांदळाच्या निर्यातदारांनाही जाणवू लागले आहे. भारताने आता कठोर भूमीका घ्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. भारत सरकारही त्या मन:स्थितीत आहे.

पाकिस्तानकडेही मागणी

बांगलादेशने पाकिस्तानकडेही तांदळाची मागणी केली आहे. तथापि, भारताचा दर प्रतिटन 335 डॉलर्स असून पाकिस्तानचा दर 395 डॉलर्स इतका आहे. त्यामुळे भारताचा दर बांगलादेशच्या दृष्टीने अधिक सुखावह आहे. त्यामुळे तो देश भारताकडून तांदूळ घेण्याची इच्छा बाळगून आहे. तथापि, भारताने सौम्य भूमिका घेऊ नये, असे मत व्यक्त केले जात आहे. गेल्या आठवड्यात बांगलादेशात भारताच्या साहाय्यक उच्चायोगाच्या कार्यालयावर इस्लामी कट्टरवाद्यांनी हल्ला केला होता. बांगलादेशच्या प्रशासनातील नेतेही भारताच्या विरोधात गरळ ओकत आहेत. त्यामुळे भारताने तांदळाचा पुरवठा थांबवावा, ही मागणी जोर धरत आहे.

Comments are closed.