वारकरी तुम्हाला नक्षलवादी वाटतात काय? शामसुंदर महाराजांचा संताप

वारीमध्ये अर्बन नक्षली घुसल्याच्या मिंधे गटाच्या आरोपाने पुरोगामी महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसला आहे. या आरोपांवर वारीमध्ये प्रबोधनात्मक कीर्तन करणारे ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी आज तीव्र संताप व्यक्त केला. ‘वारकरी तुम्हाला नक्षलवादी वाटतात काय?’ असा थेट सवाल शामसुंदर महाराज यांनी सरकारला विचारला.

वारीमध्ये शहरी नक्षलवादी विचारांचा प्रचार-प्रसार होत असल्याचा आरोप मिंधे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी अधिवेशनात केला. हा आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा वारकरी संप्रदायाने केला. याच विषयावर अभिव्यक्ती या युटय़ुब चॅनेलला मुलाखत देताना श्यामसुंदर महाराज म्हणाले की, मी विचार सांगतो, संत तुकाराम महाराजांचे, संत नामदेव महाराजांचे, जनाबाईंचे… या संतांचे विचार दिंडीमध्ये सांगितल्यानंतर हे सगळे विचार आपल्याला संविधानामध्ये दिसतात. हे विचार त्या वेळच्या काही लोकांना आवडत नव्हते. ती प्रवृत्ती आजही आहे.

वारकरी संप्रदायाच्या उभारणीपासून वारकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी  वारकरी डगमगले नाहीत. आजचेही वारकरी डगमगणार नाहीत. वारकरी संप्रदायाचा शाश्वत विचार आहे. त्या वेळी वारकरी सामोरे गेले, तसे आताही जातील, अशा शब्दांत शामसुंदर सोन्नर यांनी ठणकावले.

…तर हजारो आरोप अंगावर घेऊ

ज्या प्रवृत्तींना, ज्या मंबाजींना तुकाराम महाराज सहन झाले नाहीत… ज्या प्रवृत्तींना त्या वेळेच्या पंढरपुरामध्ये चोखामेळ्यांचं राहणं सहन झालं नाही… ज्या प्रवृत्तींना जनाबाईंचं इथलं नेतृत्व सहन झालं नाही, त्याच प्रवृत्तीचे लोक आजही समाजामध्ये आहेत. त्यांना हे विचार बोचतात – टोचतात. म्हणून त्यांनी अशा प्रकारचा आता आम्हाला नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर संत विचार सांगणे नक्षलवाद असेल तर असे नक्षलवादाचे हजारो आरोप आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत.

वारकरी संप्रदायाच्या उभारणीपासून वारकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी  वारकरी डगमगले नाहीत. आजही डगमगणार नाहीत.

Comments are closed.