एमएमसीला मराठीचे वावडे; मतदार याद्या इंग्रजीतून, निवडणूक प्रक्रियेत मातृभाषेचा वापर करण्याची डॉक्टरांची मागणी

प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य असतानाही एमएमसी अर्थात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून मतदार याद्या इंग्रजीतून तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच डॉक्टरांशीही पत्रव्यवहार इंग्रजीतूनच करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत मराठीचाच वापर करावा, अशी मागणी डॉक्टरांनी एमएमसीकडे पत्राद्वारे केली आहे.
ऑनलाइन मतदार यादी पाहिली असता तीदेखील मराठीत उपलब्ध नाही. एमएमसीच्या कार्यालयाकडून करण्यात येत असलेला पत्रव्यवहारही केवळ मराठीतूनच करण्यात येत आहे. फॉर्म 4 मध्ये मतपत्रिका मराठीत छापाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2025 चे उमेदवार डॉ. तुषार जगताप आणि डॉ. संजय वाठोरे यांनी केली आहे. हीलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनेलच्या वतीने तसे पत्र एमएमसीला पाठवण्यात आले आहे.
प्रशासकीय कामकाजात मराठीचाच वापर – निवडणूक अधिकारी
प्रशासकीय कामकाजात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून मराठी भाषेचाच वापर केला जातो, असे निवडणूक अधिकारी शिल्पा परब यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेत मराठीचाच वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अनेक डॉक्टर बाहेरून आलेले असल्याने त्यांना मतदार याद्या आणि इतर पत्रव्यवहार डॉक्टरांना कळावा यासाठी तो इंग्रजीतून असल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.