हिमाचल प्रदेशातील डॉक्टर संपावर आहेत.

सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल, सेवा ठप्प

► वृत्तसंस्था/ सिमला (हिमाचल प्रदेश)

हिमाचल प्रदेशमध्ये सरकारी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये तातडीच्या सेवा वगळता इतर सेवा ठप्प झाल्या आहेत. अनेक रुग्णालयांमधील आऊट पेशंट डिपार्टमेंटस् बंद ठेवावी लागल्याने रुग्णांचे हाल होत असून शस्त्रक्रियांचे प्रमाणही बरेच कमी झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

काही दिवसांपूर्वी रुग्णाला मारहाण केल्याप्रकरणी एका डॉक्टरला कामावरुन निलंबित करण्यात आले होते. या निलंबनाचा निषेध म्हणून हा संप पुकारण्यात आला. तो अनिश्चित काळ चालेल अशी घोषणा करण्यात आली होती. निलंबित डॉक्टरला पुन्हा विनाविलंब आणि विनाअट कामावर घेण्यात यावे. तसेच त्याच्यावरील आरोप मागे घेण्यात यावेत, अशी संपकरी डॉक्टर्सची मागणी आहे.

डॉक्टर्सची सामुहिक रजा

हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथील इंदिरा गांधी सरकारी रुग्णालयातील, तसेच राज्यभरातील अन्य बहुतेक सर्व सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्सनी शुक्रवारी सामुहिक रजा घेतल्याने राज्यातील वैद्यकीय सेवा ठप्प झाली होती. सामुहिक रजा कार्यक्रमानंतर आता अनिश्चित काळाच्या संपाची घोषणा करण्यात आली. दूर अंतरावरुन सिमला येथे उपचारांसाठी आलेल्या असंख्य रुग्णांचे या संपामुळे हाल झाले. गुरुवार रात्रीपासून शनिवारपर्यंत अनेक रुग्ण आणि त्यांच्यासह आलेले त्यांचे कुटुंबिय डॉक्टरांची प्रतीक्षा करत रुग्णालय परिसरातच तिष्ठत बसले होते.

प्रकरण काय आहे…

गेल्या बुधवारी सिमला येथील इंदिरा गांधी सरकारी रुग्णालयात डॉ, राघव नरुला आणि रुग्ण अर्जुन सिंग यांच्यात भांडण झाले. अर्जुन सिंग यांची ब्रोंकास्कोपीची शस्त्रक्रिया झाली असून ते बेडवर असताना डॉ, नरुला यांच्याशी त्यांची वादावादी झाली. डॉक्टरांनी माझ्याशी बोलताना माझा उल्लेख ‘तुम’ असा न करता ‘तू’ असा असभ्य भाषेत केला असे अर्जुनसिंग यांचे म्हणणे आहे. तर, रुग्णाने मला आणि माझ्या कुटुंबियांना उद्देशून अपशब्द उच्चारले, असे डॉक्टरचे म्हणणे आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ प्रसारित होत असून त्यात डॉक्टर रुग्णाला बुक्के मारतात आढळतो, तर रुग्णही डॉक्टरवर लाथा झाडताना दिसून येतो. या प्रकाराची चौकशी करण्यात आली. चौकशीत दोघेही दोषी असल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरला निलंबित करण्याचा निर्णय रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने घेतला. तथापि, डॉक्टर्स संघटनेने या निर्णयाला आक्षेप घेत राज्यव्यापी संप पुकारला आहे.

Comments are closed.