कुत्रा-तिरस्करणीय घड्याळ

केरळमधील इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी केले विकसित

केरळमधील इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी एक असे स्मार्टवॉच विकसित केले आहे, जे आक्रमक भटक्या श्वानांना पळवून लावू शकते. या घड्याळाचे बटन दाबताच 20-40 किलोहर्ट्झचे अल्ट्रासोनिक ध्वनी तरंग निघतात, हा आवाज माणसांना ऐकू येत नाही, परंतु आक्रमक भटक्या श्वानांना सुरक्षित अंतरावर पळवून लावू शकतो. या उपकरणाचा वापर मुले अन् वृद्धही करू शकतात.

देशाच्या अनेक भागांमध्ये भटक्या श्वानांची समस्या तीव्र झाली आहे. मुले अन् वृद्ध सर्वाधिक जोखिमीत आहेत. परंतु या समस्येवरील उपाय आता लवकरच सर्वसामान्यांच्या हातात येण्याची अपेक्षा आहे. चेंगन्नूर येथील सेंट थॉमस कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नोलॉजीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भटक्या श्वानांच्या वाढत्या धोक्याचे विश्लेषण केल्यावर अशाप्रकारचे स्मार्टवॉच विकसित केले आहेत. बाजारात श्वानांना पळवून लावणारी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु स्मार्टवॉचमध्ये अशाप्रकारच्या उत्पादनाला एकीकृत पहिल्यांदाच करण्यात आल्याचे कॉलेजच्या विभागाचे प्रमुख टिंटू मेरी जॉन यांनी सांगितले आहे.

‘सेंस-के9’ नावाच्या स्मार्टवॉचचे प्रोटोटाइप ब्लेसन मॅथ्यू विल्सन, बी. बिनसन, सॅवियो जॉय, आर. श्रीराग आणि एम. प्रवीण कुमार यांनी तयार केले आहे. त्रिशूरच्या वेल्लारक्कड येथे एका भटक्या श्वानाच्या हल्ल्यामुळे 84 वर्षीय महिलेच्या मृत्यूचे वृत्त वाचनात आल्यावर आम्हाला या समस्येवर उपाय शोधण्याचा विचार सूचला असे त्यांनी सांगितले आहे.

आक्रमक भटका श्वान नजीक आल्यास केवळ स्मार्टवॉचवरील बटन दाबावे लागणार आहे, यामुळे 20-40 किलोहर्ट्झचे अल्ट्रासोनिक ध्वनितरंग निर्माण होतात. यामुळे भटका श्वान सुरक्षित अंतरापर्यंत पळून जाईल. वापरण्यात येणारे उपकरण सोपे असल्याने ते लहान मुले, महिला, वृद्ध आणि रुग्णांसमवेत सर्वांसाठी उपयुक्त आहे. या घड्याळात एलईडी इंडिकेशन, वायब्रेशन अलर्ट आणि डिस्प्लेची सुविधा असल्याचे विद्यार्थ्याकडून सांगण्यात आले.

टीमला इतक्या छोट्या उपकरणात उच्च आवृत्तीयुक्त ध्वनितरंगांच्या उत्सर्जनाशी संबंधित प्रारंभिक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. परंतु या विद्यार्थ्यांनी यावर मात करत केवळ दोन महिन्यांमध्ये हे उपकरण विकसित केले आहे. प्रोटोटाइपच्या यशस्वी परीक्षणानंतर त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. फेब्रुवारी महिन्यात या विद्यार्थ्यांनी याचे पेटंटही प्राप्त केले आहे. आता हे स्मार्टवॉच बाजारात सादर करण्याची तयारी सुरु आहे. केरळ स्टार्टअप मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप अंबिका यांच्यासोबत पहिल्या फेरीतील चर्चाही पार पडली आहे.

एआयचा वापर करत श्वानाची ओळख पटवू शकेल आणि भूंकण्याच्या आवाजाचे विश्लेषण करत श्वान आक्रमक झाल्यास स्वयंचलित रुपात सक्रीय होऊ शकेल अशाप्रकारचे घड्याळ विकसित करण्याचा प्रयत्न आता या टीमने चालविला आहे. घड्याळात जीपीएस लोकेशन शेअरिंगसारखी सुविधाही सामील करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टीम या तंत्रज्ञानाचा वापर करून काहीसे मोठे उपकरण विकसित करण्यासाठीही तयार आहे आणि एआय तंत्रज्ञानाला एकीकृत ‘श्वानमुक्त परिसरा’च्या लक्ष्याच्या दिशेने स्वत:चा प्रवास करण्यास तयार आहे. याचा वापर नंतर भटक्या श्वानांना घर, कार्यालय, कॉलेज परिसर आणि अन्य स्थानांवरून नुकसान न पोहोचविता दूर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.

Comments are closed.