घरगुती सिलिंडरची बुकिंग आता फक्त 25 दिवसांनी

केंद्र सरकारने मर्यादा चार दिवसांनी वाढविली : अमेरिका-इराण युद्धादरम्यान साठेबाजीला आळा घालण्यासाठी निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडर रिफिल बुकिंगचे नियम बदलले आहेत. ग्राहकांना आता डिलिव्हरीनंतर 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनी दुसरा सिलिंडर बुक करता येईल. मध्य-पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस साठवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. प्रतीक्षा कालावधी 25 दिवसांपर्यंत वाढवल्याने अनावश्यक बुकिंगला आळा बसेल आणि ज्यांना खरोखर सिलिंडरची गरज आहे त्यांना सिलिंडर मिळणे सोपे होईल, असा दावा सरकारच्यावतीने करण्यात आला आहे.

मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतीय स्वयंपाकघरांवर होत आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धाचा आखाती प्रदेशातील ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. एक महत्त्वाचा सागरी व्यापार मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीने एलपीजी आणि जागतिक पुरवठ्यावर परिणाम केला आहे. भारत आपल्या गॅसच्या गरजेचा मोठा भाग कतार आणि सौदी अरेबियासारख्या देशांमधून आयात करत असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा देशाच्या गॅस पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून सरकार आणि तेल कंपन्यांनी एलपीजी पुरवठा संतुलित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळेच घरगुती गॅस बुकिंगचा वेळ वाढवण्यात आला आहे. तसेच घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी काही भागात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मर्यादित किंवा कमी करण्यात आला आहे.

ग्राहक पडताळणी प्रक्रियाही कडक

सरकारी अहवालांनुसार, घरगुती एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी किमान प्रतीक्षा कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे, म्हणजेच मागील सिलिंडरची डिलिव्हरी झाल्यापासून किमान 25 दिवस उलटल्यानंतरच ग्राहकांना नवीन सिलिंडर बुक करता येईल. या नियमनाचा उद्देश साठवणूक आणि काळाबाजार रोखणे आहे. तेल कंपन्यांनी डिलिव्हरीसाठी आवश्यक असलेली ग्राहक पडताळणी प्रक्रियादेखील कडक केली आहे. अनेक ठिकाणी गैरवापर टाळण्यासाठी सिलिंडर डिलिव्हरीच्या वेळी ओटीपी आणि बायोमेट्रिक पडताळणी देखील अनिवार्य करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच किमतीत वाढ

दोन दिवसांपूर्वी, सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 60 रुपयांनी वाढ केली होती. दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता 853 वरून 913 रुपये झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 115 रुपयांनी वाढवली असून आता ती 1,883 रुपये झाली आहे. वाढलेल्या किमती 7 मार्चपासून लागू झाल्या आहेत. यापूर्वी, सरकारने 8 एप्रिल 2025 रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली होती.

व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम

एलपीजी आयातीतील व्यत्ययाचा व्यावसायिक क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम होत आहे. अनेक राज्यांमध्ये, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि लहान व्यवसायांना व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा कमी झाला आहे. पुणे, मुंबई आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये व्यावसायिक गॅसची उपलब्धता कमी झाली आहे. पंजाबने 8 मार्चपासून व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस सिलिंडर पाठवणे थांबवले आहे. याव्यतिरिक्त तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील अनेक शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा नवीन पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला आहे. याचा परिणाम हजारो रेस्टॉरंट्स आणि बारच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.