’डॉन’चे दिग्दर्शक चंद्रा बारोट कालवश

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या कल्ट क्लासिक चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट (86) यांचे रविवारी निधन झाले. गेल्या सात वर्षांपासून ते फुप्फुसांच्या काही समस्यांमुळे ग्रस्त होते. अखेर वांद्रे येथील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रा बारोट यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दिग्दर्शक चंद्रा बारोट यांनी मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी ‘पूरब और पश्चिम’, ‘शोर’ आणि ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. ‘डॉन’ या चित्रपटातून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. अमिताभ बच्चन यांना ‘अँग्री यंग मॅन’ ही ओळख मिळवून देण्यात ‘डॉन’चा मोलाचा वाटा होता.
प्रिय मित्र गमावला…बिग बी हळहळले
‘डॉनचे दिग्दर्शक, माझे प्रिय मित्र चंद्रा बारोट आज काळाच्या पडद्याआड गेले… हे नुकसान शब्दांत सांगणं कठीण आहे… आमचं नातं केवळ व्यावसायिक नव्हतं… आम्ही एका कुटुंबासारखे राहिलो होतो… मी केवळ प्रार्थना करू शकतो.’ असे अमिताभ बच्चन यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Comments are closed.