अमेरिकेतील बेकायदा हिंदुस्थानींची धरपकड; हजारो शेतमजुरांना पकडून नजरकैदेत ठेवले, शेकडो जणांना देशाबाहेर पाठवले
अमेरिकेत दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करणे सुरूच ठेवले आहे. अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या 30 हजार हिंदुस्थानी शेतमजुरांना आता कारवाईच्या भीतीने काम सोडावे लागले आहे. हजारो शेतमजुरांना पकडून नजरकैदेत ठेवण्यात आले असून पकडल्या गेलेल्या शेकडो लोकांना अमेरिकेबाहेर काढण्यात आले आहे.
ट्रम्प सरकारने स्थलांतरितांना देशातून हद्दपार करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हजारो लोक बेकायदेशीर राहत होते. अनेक मजुरांकडे अमेरिकेत राहण्याचे आणि काम करण्याचे पूर्ण कागदपत्रे नाहीत. त्यामुळे इमिग्रेशन एजन्सी आयसीईच्या छाप्यांची आणि पकडले जाण्याच्या भीतीने या शेतमजुरांनी शेतांमध्ये काम करण्याचे थांबवले आहे. याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे.
बाजू मांडण्यासाठी वकील हवा
अमेरिकेत आवश्यक कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या लोकांनाही काही कायदेशीर अधिकार मिळतात, मात्र बाजू मांडण्यासाठी त्यांना वकील हवा आहे. ज्यांच्याकडे वकील लावण्यासाठी पैसे नाहीत त्यांना कायदेशीर मदत मिळणे कठीण झाले आहे. आयसीईच्या कारवाईच्या भीतीने अनेक शेतमजूर आता पेट्रोल पंप, किराणा दुकान आणि इमारतींच्या बांधकामाकडे वळले आहेत.
Comments are closed.