ट्रम्प-पुतीन भेटीनंतरही युक्रेन युद्धावर तोडगा नाही, अडीच तासांच्या बैठकीत फक्त ‘अलास्का’ गेलास का?

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची महत्त्वपूर्ण भेट आज अलास्कामध्ये झाली. साधारण अडीच तास बंद दाराआड चाललेल्या या बैठकीत युक्रेन युद्धावर कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. कोणतीही औपचारिक घोषणा झाली नाही. ’आलास का, गेलास का’ एवढय़ापुरतीच ही बैठक मर्यादित राहिली.

बैठकीनंतर पत्रकारांकडून कुठलेही प्रश्न घेण्यात आले नाहीत. अवघ्या काही मिनिटांत ही पत्रकार परिषद गुंडाळली गेली. द्विपक्षीय संबंध व युक्रेन मुद्दय़ांवर भविष्यात संवाद होत राहील, अशी आशा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.

पूर्ण झाली तरच ती डील

ही बैठक खूपच फलदायी झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. अनेक मुद्दय़ांवर सहमती झाली आहे, पण काही महत्त्वाचे मुद्दे बाकी आहेत. या बैठकीतील चर्चेची माहिती युक्रेन व नाटो देशांना दिली जाईल. डील पूर्ण होईल तेव्हाच तिला ‘डील’ म्हणता येईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

युरोपीय देशांनी खोडा घालू नये!

पुतीन यांनी पत्रकार परिषदेत परखड भूमिका मांडली. ‘अमेरिका व रशियाचे संबंध शीतयुद्धानंतर पहिल्यांदा इतके बिघडले आहेत. चर्चेची गरज आहे. या बैठकीलाही बराच उशीर झाला. आता युक्रेन व युरोपीय देश यात खोडा घालणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.

Comments are closed.