असे पोप आम्हाला नकोत; डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप, स्वत:चाच ‘देवदूत’ अवतारातील फोटो केला शेअर

इराण आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेली शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला असतानाच पोप लिओ XIV यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. ही टीका ट्रम्प यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून ट्रूथ सोशल यावर भलीमोठी पोस्ट लिहून ट्रम्प यांनी पोप यांच्यावर जोरदार पलटवार केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पोप लिओ यांच्यावर गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आणि परराष्ट्र धोरणाबाबत चुकीची मते मांडल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर स्वत:चा देवदुताच्या अवतारातील फोटोही शेअर केला. यामुळे व्हॅटिकन आणि व्हाईट हाऊसमधील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसते.

पोप लिओ हे गुन्हेगारीच्या बाबतीत मवाळ भूमिका घेत आहेत आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत त्यांना काहीही समजत नाही. ते अशा लोकांचे समर्थन करत आहेत जे अमेरिकेचे नुकसान करू इच्छितात. मला आश्चर्य वाटते की, ते माझ्या सरकारवर टीका करत आहेत, पण जेव्हा कोविड काळात पाद्रींना चर्चमध्ये प्रार्थना करण्यापासून रोखले जात होते आणि त्यांना अटक केली जात होती, तेव्हा हेच पोप कुठे होते? त्यांनी तेव्हा आवाज का उठवला नाही? असा सवाल ट्रम्प यांनी केला.

इराणकडे अणुशस्त्रे असावीत असे इच्छिणारे पोप आम्हाला नको आहेत. तसेच व्हेनेझुएलासारख्या देशांवर आम्ही केलेली कारवाई योग्यच होती. कारण तिथून आपल्या देशात ड्रग्ज आणि गुन्हेगार येत होते. मी माझ्या देशाचे संरक्षण करत आहे. मी विक्रमी कामगिरी करत वेगाने गुन्हेगारी कमी केली आहे आणि शेअर बाजार ऐतिहासिक उंचीवर नेला आहे. पोप यांनी राजकारण सोडून कट्टरपंथी डाव्यांच्या दावणीला बांधले जाणे थांबवावे आणि एक चांगले आध्यात्मिक गुरू म्हणून काम करावे. जर मी निवडून आलो नसतो, तर ते आज त्या पदावर नसते, असेही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी पोप लिओ यांची तुलना त्यांचे भाऊ लुईस यांच्याशी केली. मला त्यांचा भाऊ लुईस जास्त आवडतो. कारण लुईस हे पूर्णपणे मेक अमेरिका ग्रेट अगेनचे समर्थक आहेत. त्यांना परिस्थिती समजते, पण लिओ यांना ते समजत नाही, असेही ट्रम्प म्हणाले.

करार होणारच होता, पण…; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं चर्चा फिसकटण्याचं कारण

Comments are closed.