होर्मुझ सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा मोठा दावा; ‘अमेरिकेचा नवा भूभाग’ म्हणून नकाशा केला शेअर

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरून मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एक नकाशा शेअर करत होर्मुझ सामुद्रधुनीला ‘अमेरिकेचा नवा भूभाग’ असे संबोधले. या सामुद्रधुनीवर अमेरिकेचे नियंत्रण असल्याचा दावा ट्रम्प यांनी यापूर्वीही केला होता.

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची सागरी मार्गांपैकी एक आहे. इराण आणि ओमानच्या किनाऱ्यादरम्यान असलेल्या या सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणावर तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. त्यामुळे तिच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

ट्रम्प यांनी शेअर केलेल्या नकाशात होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरावर अमेरिकेचा दावा दर्शवण्यात आला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या नकाशामुळे इराण, ओमान किंवा संयुक्त अरब अमिरातीच्या भूभागावर अमेरिकेचे कायदेशीर सार्वभौमत्व निर्माण होत नाही. होर्मुझ सामुद्रधुनीचा मोठा भाग इराण आणि ओमानच्या प्रादेशिक जलक्षेत्राशी संबंधित आहे.

ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे विशेषतः ओमानसोबतचा अमेरिकेचा संबंधही चर्चेत आला आहे. ओमान हा अमेरिकेचा दीर्घकाळचा सहकारी असून, अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावत आला आहे. मात्र, होर्मुझ सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनावरून ओमानने इराणसोबत सहकार्य केल्यास कारवाईची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

इराणसोबतच्या करारासाठी अमेरिकेचा शेवटचा प्रयत्न

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील अंतरिम करारासाठी निश्चित करण्यात आलेली 60 दिवसांची मुदत संपली आहे. या कालावधीनंतरही होर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी वाहतूक पूर्ववत करण्याबाबत ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे इराणसोबत करार करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून शेवटच्या टप्प्यात राजनैतिक प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे.

या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिकेने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. अहवालानुसार, इराकच्या नव्या पंतप्रधानांच्या माध्यमातून IRGCच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणसोबत कोणत्याही प्रकारचा सन्मानजनक करार घडवून आणण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

होर्मुझवर अमेरिकेचा वाढता दबाव

ट्रम्प यांनी यापूर्वीही अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीवर ‘पूर्ण नियंत्रण’ असल्याचा दावा केला होता. अमेरिकेच्या नौदलाच्या नाकेबंदीला त्यांनी ‘स्टीलची भिंत’ असे संबोधले होते.

दुसरीकडे, इराणनेही या सामुद्रधुनीवर नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी सध्या अमेरिका-इराण संघर्षातील प्रमुख रणनीतिक मुद्दा बनली आहे. या मार्गावरील तणावाचा थेट परिणाम जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर होण्याची शक्यता असल्याने जगाचे लक्ष या संघर्षाकडे लागले आहे.

Comments are closed.