…तर मी तुम्हाला नरक कसा असतो ते दाखवेन; ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, मध्य-पूर्वेत युद्धाचे ढग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका पुन्हा एकदा जोरदार हल्ले करेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. फ्लोरिडा येथील मार-ए-लागो इस्टेटमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जून महिन्यात अमेरिकेने इराणच्या महत्त्वाच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करून त्यांची क्षमता पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, आता इराण संशयास्पद हालचाली करत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, “मला कळले आहे की इराण पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. जर ते तसे करत असतील, तर आम्हाला त्यांना रोखावे लागेल. आम्ही त्यांच्यावर असा प्रहार करू की ते पुन्हा सावरू शकणार नाहीत. आम्ही त्यांना नरकाचे दार दाखवून देऊ.”

इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षानंतर इराणने सैन्य ताकद वाढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इराण पुन्हा अण्वस्त्र मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे या युद्धात अमेरिकाही खेचली गेली असून इराणने अण्वस्त्र मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा सैन्य ताकद वाढण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना नरकाचे दार दाखवू आणि पूर्णपणे संपवून टाकू, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

दरम्यान, इस्रायलने देखील इराणच्या वाढत्या क्षेपणास्त्र क्षमतेवर चिंता व्यक्त केली आहे. इराण इस्रायलपर्यंत पोहोचू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा साठा पुन्हा वाढवत असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जर इराणच्या अण्वस्त्र हालचालींची पुष्टी झाली, तर त्याचे परिणाम मागील वेळेपेक्षाही अधिक भयानक असतील.

दुसरीकडे, इराणने आपण कोणत्याही ठिकाणी युरेनियमचे संवर्धन करत नसल्याचा दावा केला आहे. पाश्चात्य देशांशी वाटाघाटीसाठी आपले दरवाजे उघडे असल्याचे इराणने सुचवले आहे. मात्र, ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यातील या बैठकीमुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचे वरिष्ठ सल्लागार ॲडमिरल अली शामखानी यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला असून कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली आहे.

Comments are closed.