रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेच्या तिजोरीत मोठी भर, ORF च्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के कर लादला आहे. यापूर्वी 25 टक्के कर लादण्यात आला होता. त्यानंतर आता भारतात रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अतिरिक्त 25 टक्के कर लादले आहे. परंतु एका नवीन अहवालात असे दिसून आले आहे की युक्रेनमधील युद्धाचा अमेरिकेलाच मोठा फायदा झाला आहे. थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) च्या मते, रशिया- युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेच्या संरक्षण नेटवर्कच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. सध्या, अमेरिका युक्रेनच्या एकूण शस्त्र खरेदीपैकी 45 टक्के खरेदी करत आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं रशियाला युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु ठेवण्यास आर्थिक मदत होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा घेत भारत स्वस्तात तेल खरेदी करुन मोठी कमाई करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ORF) या थिंक टँकनं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील माहिती आणि आकडेवारीनं ट्रम्प तोंडावर पडले आहेत.

युक्रेनच्या एकूण शस्त्रास्त्र खरेदीपैकी 45 टक्के खरेदी अमेरिकेकडून

युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर अमेरिकेच्या डिफेन्स नेटवर्कच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला युक्रेनच्या एकूण शस्त्रास्त्र खरेदीपैकी 45 टक्के खरेदी अमेरिकेकडून होत असल्याचा तपशील ORFच्या अहवालात आहे. ‘जागतिक संरक्षण खर्च 2024 मध्ये 9.4 टक्क्यांनी वाढून 2.72 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला. शीतयुद्ध संपल्यानंतर पहिल्यांदाच संरक्षणावरील खर्च इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रशिया-युक्रेन संघर्ष यामागचं प्रमुख कारण आहे,’ अशी माहिती अहवालात आहे. युक्रेन संघर्षात अमेरिकेनं आपल्या संरक्षण-औद्योगिक आधाराचा वापर करुन युद्ध प्रयत्नांमध्ये सहाय्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अमेरिकेनं युक्रेनच्या सशस्त्र दलांना शस्त्रास्त्रं, युद्ध सामग्री आणि अन्य लष्करी उपकरणं पुरवली. जो बायडन प्रशासनापासून सुरु झालेला नफा ट्रम्प यांच्या कार्यकाळातही सुरुच राहिला.

2020 ते 2024 या कालावधीत युक्रेन जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश

2020 ते 2024 या कालावधीत युक्रेन जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश ठरला. जागतिक आयातीत त्यांचा वाटा 8.8 टक्क्यांवर गेला. 2015 ते 2009 या कालावधीत हा वाटा केवळ 0.1 टक्के होता. याचा अर्थ युक्रेनची आयात तब्बल 9627 टक्क्यांनी वाढली,’ अशी आकडेवारी ओआरएफच्या अहवालात आहे.

2020 ते 2024 या कालावधीत अमेरिकेनं युक्रेनला 45 टक्के शस्त्रं विकली. अमेरिकेच्या एकूण शस्त्र निर्यातीचा विचार केल्यास त्यात युक्रेनला करण्यात आलेल्या निर्यातीचं प्रमाण 9.3 टक्के होतं. 2023 आणि 2024 मध्ये युक्रेन शस्त्रं खरेदीत अव्वल होता. ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेनं युक्रेनला 3350 विस्तारित रेंज अटॅक म्युनिशन क्षेपणास्त्रं आणि संबंधित उपकरणं 825मिलियन डॉलरला विक्री करण्याच्या निर्णयास मंजुरी दिली. या विक्रीसाठीचा निधी नाटोचे सहकारी देश आणि अमेरिकेच्या एफएमएफधून येतो. हे एक प्रकारचं कर्ज आहे,’ असा तपशील अहवालात आहे.

युद्धाचे सर्वात मोठे आर्थिक फायदे अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उद्योगाला

रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेचा राजकीय वर्ग भारताला “रशियाचा मित्र” म्हणून लक्ष्य करत असला तरी, वास्तविकता अशी आहे की या युद्धाचे सर्वात मोठे आर्थिक फायदे अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उद्योगाला मिळत आहेत. अमेरिकेतही ट्रम्प आणि बायडेन प्रशासन युद्धाच्या जबाबदारीसाठी एकमेकांवर दोषारोप करत आहेत, परंतु दोन्ही कार्यकाळात अमेरिकन शस्त्रास्त्र कंपन्यांना फायदा झाला आहे. खरं तर, भारताने जागतिक स्तरावर या कथेला आव्हान देण्याची गरज आहे, कारण त्याची तेल आणि ऊर्जा आयात ही संतुलित रणनीतीचा भाग आहे.

महत्वाच्या बातम्या:

Russia Ukraine War : रशियासोबत युद्धाच्या काळात झेलेन्स्कींचा मास्टरस्ट्रोक, ‘या’ महिला नेत्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी, युक्रेनसाठी टर्निंग पॉइंट ठरणार?

आणखी वाचा

Comments are closed.