ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचा 2025 मध्ये बोलबाला राहिला. टॅरिफमुळं अमेरिकेचा महसूल वाढला असा दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसत आहे. अमेरिकेतील कंपन्या दिवाळखोरीत निघत आहेत.  2025 मध्ये दिवाळखोरीत जाणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या 15 वर्षांचा उच्चांक दिवाळखोरीत निघणाऱ्या कंपन्यांच्या संख्येनं गाठला आहे. ट्रम्प टॅरिफ हे सर्वात मोठं कारण असल्याचं कंपन्या सांगत आहेत. याशिवाय महागाईचा देखील फटका बसत आहे.

अमेरिकेतून धक्कादायक आकडेवारी

द वॉशिंग्टन पोस्टच्या एका रिपोर्टनुसार 2025 मध्ये अमेरिकेत कंपन्या दिवाळखोरीत निघण्याची संख्या वाढली आहे. महामंदीनंतर जितक्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या, तितक्या संख्येनं कंपन्या दिवाळखोरीत निघत आहेत. एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये  717 कंपन्यांनी चॅप्टर किंवा चॅप्टर 11 नुसार दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. 2024 च्या 11 महिन्यांच्या आकडेवारीच्या तुलनेत  2025 मधील आकडेवारी 14 टक्क्यांनी जास्त आहे.  तर, 2010 नंतरची सर्वाधिक आहे.

चॅप्टर 11 ला पुनरर्चना देखील म्हटलं जातं. यात कंपनी न्यायालयाद्वारे संचलति प्रक्रियेद्वारे त्यांच्या कामांची पुनर्रचना करते आणि कामकाज सुरु ठेवते. तर, चॅप्टर  11 नुसार कंपनी बंद होते, त्यांची संपत्ती विकली जाते.

आयातीवर आधारित व्यवसाय ठप्प

रिपोर्टनुसार अमेरिकेतील जे व्यवसाय थेट आयातीवर अवलंबून होते, त्यांना दशकातील सर्वाधिक टॅरिफचा सामना करावा लागला. दिवाळखोरीचे अर्ज करणाऱ्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ औद्योगिक क्षेत्रात दिसून आली आहे. ज्यात  निर्माण, पुनर्निमाण, वाहतूक कंपन्यांचा समावेश आहे. काही व्यवसाय टॅरिफ आणि इतर खर्चांच्या दबावात असल्याचं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

दिवाळखोरीचा अर्ज करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्यासमोरील आर्थिक आव्हानांसाठी महागाई, व्याज दरांना जबाबदार धरलं आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या व्यापारी धोरणामुळं सप्लाय चेनवर परिणाम झाला, यामुळं उत्पादन खर्च वाढल्याचं म्हटलंय.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांचं काय?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सातत्यानं बदलणाऱ्या टॅरिफ धोरणाचा विविध क्षेत्रांवर वाईट परिणाम झाला आहे. अमेरिकेत निर्मिती क्षेत्र पुन्हा उभं करण्यास टॅरिफमुळं मदत मिळतेय, असं ट्रम्प म्हणतात. मात्र, नोव्हेंबर महिन्यात संपलेल्या एका वर्षाच्या कालावधीत उत्पादन क्षेत्रातील  70 हजार नोकऱ्या संपल्या आहेत.

दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारावर चर्चा सुरु आहेत. अद्याप दोन्ही देशातील व्यापारी करार झालेला नाही.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.